नागपूर : कोरोना संक्रमणाचे सत्र आटोपत नाही तोच राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘खसरा (मिजल्स)’ अर्थात ‘गोवर’चा प्रकोप वाढायला लागला आहे. विशेषतः याचे संक्रमण नवजातकांपासून ते बालकांपर्यंतच होत असून, आतापर्यंत राज्यात या संक्रमणाने नऊ मुलांचा जीव गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन रुग्णांचे समीक्षण आणि आवश्यक पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते.
कोरोना संक्रमणाच्या तुलनेत ‘खसरा’ संक्रमणाचा वेग कित्येक पटीने जास्त आहे. चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार वेळेत एमआर व्हॅक्सिन दिली गेली तर या संक्रमणाच्या तीव्रतेपासून बऱ्यापैकी बचाव केला जाऊ शकतो. विदर्भात अकोला, अमरावतीपर्यंत हे संक्रमण पोहोचले असून, नागपुरात या अवघड स्थितीचा सामना करण्याची तयारी झाली आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये एमआर व्हॅक्सिन उपलब्ध करवून देण्यात आली आहेत.
मनपाच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्या कुटुंबात पाच वर्षापर्यंतची मुले आहेत, त्यांना व्हॅक्सिन देण्याचे आवाहन केले जात आहे. श्वसन यंत्रणेवर विषाणूच्या संक्रमणाने गोवर होतो. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकल्यासारखी लक्षणे असतात. ९० टक्के नागरिक ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे आणि जे संक्रमित व्यक्तीसोबत एकाच घरात राहतात, ते या आजाराला बळी पडू शकतात. हे संक्रमण १४ दिवसांपर्यंत प्रभावी राहते आणि दोन ते चार दिवसांपूर्वी शरीरावर दाणे उमळण्यास सुरुवात हाेते. अशक्त आणि कुपोषित बालकांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता अधिक आहे. लक्षण दिसताच उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घरगुती उपचारांत वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे, या आजारावर कोणताच उपचार नाही. परंतु, लक्षणांच्या आधारावर उपचार सुरू करता येते.
तत्काळ मुलांचे लसीकरण करा
- गोवरसंदर्भात राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे मनपाचे संक्रमण अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले. ज्या मुलांना एमआर व्हॅक्सिन दिले गेले नाही त्यांना ही लस तात्काळ देणे गरजेचे आहे. नागपुरात सद्य:स्थिती हे संक्रमण पोहोचलेले नाही. परंतु, संक्रमणाचा वेग अतिशय तीव्र असल्याने सजगता बाळगणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर एका महिन्यात शरीरात ॲण्टीबॉडी तयार व्हायला लागत असल्याचे नवखरे यांनी सांगितले.
प्रमुख मुद्दे
- शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये एमएमआर किंवा एमआर लस उपलब्ध आहे. ही लस नऊ महिन्यांपर्यंत आणि त्यानंतर १८ ते २४ महिन्यांच्या दरम्यान देणे गरजेचे आहे.
- नागपूर मनपा क्षेत्रात जुलैनंतर एकाही गोवरच्या रुग्णाची नाेंद झालेली नाही. परंतु, विदर्भातील अनेक भागात याचा प्रकोप वाढला असल्याने सजगता बाळगणे गरजेचे आहे.
- मार्चपासून आतापर्यंत नऊ महिन्यांपर्यंतच्या २३ हजार मुलांना ही लस दिली आहे, तर १८ ते २४ महिन्यांपर्यंतच्या २१ हजार मुलांनी ही लस घेतली आहे. दुसरी मात्रा घेण्यासाठी नागरिकांनी तत्परता दाखवणे गरजेचे आहे.