निशांत वानखेडे
नागपूर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील जनजीवन विस्कटले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास समस्या हाेत असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये प्रदूषण दिल्लीएवढे नसले तरी थंडी वाढताच हवा खराब हाेत चालली आहे. शहरातील चारही स्टेशनवर वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) २२० च्यावर पाेहचला आहे, जाे वाईट हवेचा मानक आहे.
तज्ज्ञांच्या मते दरवर्षी थंडी वाढली की प्रदूषणातही वाढ हाेते. हिवाळ्याच्या बहुतेक महिन्यात हवेची गुणवत्ता खराब असते. तीच स्थिती यावर्षीही दिसून येत आहे. साधारणत: १५ नाेव्हेंबरपासून पारा घसरून थंडीत वाढ हाेत आहे, तसे प्रदूषणही वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या वेबसाईटवरील चालू आकडेवारीनुसार नागपूरच्या चारही स्टेशनवर एक्युआय २०० च्यावर गेला आहे.
भारतीय मानकानुसार वायू निर्देशांक ० ते ५० पर्यंत चांगला, ५१ ते १०० पर्यंत समाधानकारक व १०१ ते २०० पर्यंत मध्यम गुणवत्तेचा असताे. २०१ ते ३०० पर्यंत वाईट, ३०१ ते ४०० खुप खराब व ४०० च्यावर अतिशय धाेकादायक असताे. सीपीसीबीच्या १६ ते २१ नाेव्हेंबरच्या नाेंदीनुसार केवळ १९ नाेव्हेंबर राेजी एक्युआय २०० च्या आतमध्ये हाेता. इतर दिवशी ताे २१० ते २५५ पर्यंत म्हणजे वाईट स्थितीत गेल्याची नाेंद आहे.
कशी हाेती स्थिती?
- सीपीसीबीच्या अंबाझरी, जीपीओ, रामनगर व महाल या चार स्टेशनवर दर तासाला नाेंदी घेतल्या जातात.
- या नाेंदीनुसार २० व २१ नाेव्हेंबरला हवेची गुणवत्ता सातत्याने २२० च्यावर नाेंदविण्यात आली आहे.
- महाल आणि रामनगर येथे २० नाेव्हेंबरला एक्युआय ३५५ पर्यंत म्हणजे अतिशय वाईट अवस्थेत गेल्याचीही नाेंद आहे.
- दाेन्ही स्टेशनवर पहाटेचा वेळ साेडला तर प्रत्येक तासाला एक्युआय २१० ते २५५ च्यादरम्यान राहिला आहे.
- सिव्हील लाईन्ससारख्या भागातील जीपीओ स्टेशनवर २१ राेजी दुपारी १२ वाजतापासून २२४ वर गेलेले एक्युआय सायंकाळी ६ वाजतापर्यंत २४० वर गेल्याची नाेंद आहे.
धुलीकण प्रदूषणास कारणीभूत
नागपूरच्या प्रदूषणात पार्टीकुलेट मॅटर (धुलीकण) हाच सर्वात माेठा घटक आहे. पीएम-२.५ व पीएम-१० या प्रदूषकाच्या वाढीमुळे संत्रानगरीत प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरात सध्या माेठ्या प्रमाणात बांधकाम हाेत आहे. त्यामुळे धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
थंडीतच का वाढते प्रदूषण?उन्हाळ्यात सर्वाधिक प्रदूषण हाेत असले तरी हे घटक वातावरणात उडून जातात. हिवाळ्यात त्याच्या विपरित असते. वातावरणात असलेल्या दवबिंदूला चिकटून प्रदूषित धुलीकण जमिनीच्या आसपासच पसरलेले असतात. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढलेला असताे.