खापरखेडा (नागपूर) : वारेगाव (ता. कामठी) शिवारातील कोलार घाट येथे काेलार नदीवर असलेल्या पुलालगतच्या राेडच्या सिमेंट काॅंक्रीटचे तुकडे आणि आत भरलेला मुरूम व दगड बाहेर यायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत हा राेड आतून पाेकळ हाेऊन काेसळण्याची व तिथे माेठा अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
नागरिक या राेड व पुलाचा वापर रहदारी व अंत्यसंस्काराला जाण्यासाठी करतात. या पुलाच्या एका बाजूला वारेगाव, तर दुसऱ्या बाजूला भानेगाव घाट (स्मशानभूमी) आहे. या राेडचे वारेगाव घाटाकडील सिमेंट काँक्रीट निघायला सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी येथे मातीचा भराव टाकण्यात आला हाेता. मात्र, पावसाळ्यातील पुरात संपूर्ण भराव वाहून गेला. त्यातच राेडच्या बाजूला तडेही गेले आहेत. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या जनसुविधेच्या फंडातून येथे दहा लाख रुपयांचे बांधकाम करण्यात आले हाेते.
हा राेड पुढे खापरखेडा-कामठीराेडला जाेडला आहे. स्मशानभूमीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची असली तरी राेड व पूल मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. काेसळत असलेल्या या राेडची वेळीच याेग्य दुरुस्ती न केल्यास येथे माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे वेळीच याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वारेगाव कोलार घाट सिमेंट रस्त्याच्या खाली पुराच्या पाण्यामुळे पोकळी तयार झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी माहिती दिली आहे. यावर उपाययाेजना केल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.
- कमलाकर बांगरे, सरपंच, वारेगाव, ता. कामठी
या राेडचे काम चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या जनसुविधा निधीतून करण्यात आले. हा राेड पाेकळ हाेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला लेखी कळविले आहे.
- अरुण बोंद्रे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत वारेगाव, ता. कामठी