लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते, फूटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्र्रुप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपातर्फे उपद्रव शोधपथक तैनात करण्यात आले आहे. बुधवारी पथकाद्वारे संविधान चौकात अस्वच्छता पसरविणाऱ्या १९ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली.संविधान चौकामध्ये सिग्नलवर उभे राहून थुंकणे, कचरा टाकणे असे उपद्रव पसरविले जातात. ही बाब लक्षात येताच चौकातील चारही सिग्नलवर पथक तैनात करण्यात आले. यावेळी रस्त्यावर थुंकणे, खर्रा खाऊन पॉलिथिन रस्त्यातच टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यावर थुुंंकणाऱ्या १३ उपद्रवींवर कारवाई करीत त्यांच्याकडून २६०० रुपये दंड तर खर्रा खाऊन पॉलिथिन टाकणाऱ्या ६ उपद्र्रवींवर कारवाई करीत ६०० रुपये दंड असे एकूण १९ जणांकडून ३२०० रुपये वसूल करण्यात आले.शहर विद्रुप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पथकाद्वारे दररोज शहरातील विविध भागात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी जबाबदारी बाळगून कुठेही अस्वच्छता पसरवू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ व मंगळवारी झोनच्या पथकाकडून संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली.