वाडी/नागपूर : वाडीतील पंपावर पेट्रोलचा टँकर रिकामा करताना शनिवारी दुपारी भीषण आग लागली. पंपावरील कर्मचारी, अग्निशमन दल आणि सेवाभावी नागरिकांनी वेळीच प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. आगीत ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. हरपालसिंग बावेजा यांचा वाडी परिसरात कृष्णा पेट्रोल पंप आहे. शनिवारी दुपारी १.४५ च्या सुमारास या पेट्रोल पंपावर एमएच-३४/एबी-७४३ क्रमांकाच्या टँकरने खापरी डेपातून १० हजार लिटर पेट्रोल आणि तेवढेच डिझेल आले. अंडरग्राऊंड टँकमध्ये ते खाली केले जात असताना अचानक आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. आजूबाजूच्यांनीही मदत केली. मात्र, आगीने संपूर्ण पेट्रोल पंपालाच कवेत घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्वच बाहेर पळाले. त्यांनी वाडी पोलीस ठाणे तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. ती कळताच पोलीस ताफा, हिंगणा एमआयडीसीतून अग्निशमन दलाचा बंब पोहोचला. मात्र, आग एवढी भीषण होती की एका बंबाने ती विझणे शक्यच नव्हते. त्यामुळे नागपूरहून सहा बंब बोलविण्यात आले. के.जी. सावंत, राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपाची आग विझविण्यासोबतच ती परिसरात पसरू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले. दरम्यान, या भीषण आगीचे लोट अर्धा किलोमीटर अंतरावरून दिसू लागले. आगीची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांची तोबा गर्दी उसळली. आगीची भीषणता आणि बघ्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता दुसरीच दुर्घटना घडू नये म्हणून वाडीचे ठाणेदार मुरलीधर करपे आपल्या ताफ्यासह प्रयत्न करू लागले. मदतीला एमआयडीसीचा पोलीस ताफाही पोहोचला. गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर, पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, एमआयडीसीचे सहायक आयुक्त माने, गुन्हे शाखा, विशेष शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या भीषण आगीत पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाच मोटरसायकली, पंपचे शेड, पेट्रोल-डिझेल वितरित करणाऱ्या मशीन, कार्यालय, टँकर जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पंपाशेजारी याच पेट्रोल पंपमालकाचे कृष्णा वाईन शॉप आणि बाजूला एटीएम आहे. त्यांचे कसल्याही प्रकारे नुकसान झाले नाही. (प्रतिनिधी)भीषण दुर्घटना टळलीपंपाच्या बाजूलाच प्लास्टिकचे मोठमोठे गोदाम आहे. तेथे मोठ्या प्रमाणात मजूर कामाला असतात. या गोदामाला आगीने विळख्यात घेतले असते किंवा टँकरचा स्फोट झाला असता तर भयावह दुर्घटना घडली असती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे भीषण दुर्घटना टळली.आगीचे कारण अस्पष्टपेट्रोप पंपाला आग कोणत्या कारणामुळे लागली, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. टँकर खाली करण्यापूर्वी जमिनीपासून टँकरला अर्थिंग लावले जाते. ती प्रक्रिया नेहमीप्रमाणे पूर्ण केली होती. मात्र शनिवारी तापमान ४४ अंशाच्या आसपास होते. त्यामुळे उष्णता किंवा अर्थिंग यापैकीच एका कारणामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पेट्रोल पंपावर ‘भडका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2015 2:15 AM