नागपूर : भारतातील लोक आता मोठ्या प्रमाणावर बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. त्यामुळेच संघाचे धाबे दणाणले असून मोहन भागवत यांना ‘पापक्षालन’ आठवले आहे, अशी टीका रिपब्लिकन सेनाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत केली.
आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचा मुद्दा उपस्थित केला. दीक्षाभूमी ही सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तावडीत सापडली आहे. तिला मुक्त करण्यासाठी आम्ही यापुढे लढा देणार. दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेला मिळाली होती. स्मारक समिती ही केवळ बांधकामापुरती होती. सध्या येथे आरएसएसच्या लोकांचा भरणा झाला आहे. दीक्षाभूमीचा कारभार भारतीय बौद्ध महासभेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली. स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.
- आठवले जोकर
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करीत आनंदराज आंबेडकर यांनी आठवले यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले आठवले हे मूर्ख आहेत, राजकारणातील जोकर आहेत.
- पटवर्धन मैदानाच्या जागेसाठी तीन महिन्यानंतर आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी पटवर्धन मैदानाची जागा स्मारकासाठी देण्यात आली होती. त्याबाबत नव्या सरकारने येत्या तीन महिन्यात निर्णय घ्यावा. अन्यथा मी स्वत: इंदू मिलप्रमाणे नागपुरात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.