लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) च्या वतीने ए. बी. बर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रेल्वेस्थानक मार्गावरील परवाना भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहनदास नायडु होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी कान्नन गोपीनाथन, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, आयटकचे महासचिव शाम काळे, बी. एन. जे. शर्मा, मोहन शर्मा उपस्थित होते. काश्मीर प्रश्नावर आय. ए. एस. पदाचा राजीनामा देणारे कान्नन गोपीनाथन म्हणाले, देशात प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यात येत आहे. लोकशाहीत जेव्हा जनता प्रश्न विचारणे बंद करते तेव्हा देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे होते. शासन एकामागुन एक चुकीचे निर्णय घेत आहे. पैसा नसल्यामुळे बीपीसीएलचे खाजगीकरण करण्यात येत असून त्याला आर्थिक सुधारणेचे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे अन्याय सहन करण्याची सवय सोडून, नागरिकांनी आपले कर्तव्य ओळखण्याची गरज आहे. ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, भाई बर्धन यांना भेटू शकलो, बोलू शकलो ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. राजकीय क्षेत्रात पारदर्शकता कशी जोपासावी याचा धडा त्यांनी घालून दिला. सामान्य नागरिकांना बर्धन आपलेसे वाटत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन जमिनीशी नाते कायम ठेवणारे बर्धन यांचा आदर्श बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन शर्मा म्हणाले, भाई बर्धन यांनी आदिवासी, कामगार, कष्टकºयांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचले. दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाई बर्धन आणि सुदाम देशमुख यांना व्यासपीठावर बोलावले होते. आयटकच्या माध्यमातून देशातील सर्व ट्रेड युनियनला बर्धन यांनी एका सूत्रात बांधल्याचे मोहन शर्मा यांनी सांगितले. यावेळी टी. एस. बुचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मोहन शर्मा यांनी केले. आभार आयटकचे महासचिव शाम काळे यांनी मानले.