नागपूर : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा प्रशासन, नागपूर महानगर पालिका व विदर्भ खो-खो संघटनेच्या वतीने रा. पै. समर्थ स्टेडियम (चिटणीस पार्क) येथे पार पडलेल्या कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत महिला व मुलांच्या १४ वर्ष वयोगटात ठाणे जिल्ह्याने बाजी मारत विजेतेपदाचे दुहेरी मुकूट धारण केले आहे. यासोबतच पुरुषांच्या गटात मुंबई उपनगरने तर मुलींच्या १४ वर्ष वयोगटात सांगली जिल्ह्याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
रविवारी या स्पर्धेचे सर्व गटातील अंतिम सामने खेळले गेले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात ठाणे जिल्ह्याने नाशिक जिल्ह्याचा पराभव केला. चुरसीच्या ठरलेल्या या सामन्यात ठाणे जिल्ह्याने नाशिकचा १०-९ अर्थात एका गड्याने पराभव केला. या सामन्यात ठाण्याच्या शितल भोरने हिने ६ गडी बाद करत विजयात योगदान दिले तर नाशिकच्या मनिषा पडेर हिने ५ गडी बाद केले. उपांत्य फेरिमध्ये नाशिकने उस्मानाबादला तर ठाणे जिल्ह्याने सांगलीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
मुलांच्या १४ वर्ष वयोगटातील अंतिम सामन्यात ठाणे जिल्ह्याने उस्मानाबादचा १३-११ अर्थात दोन गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. ठाणेच्या ओंकार सावंत याने ३ व आशिष गौतमने ४ गडी बाद केले. उस्मानाबादकडून आराध्य वसावे याने ४ गडी बाद केले. उपांत्य फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने सांगली जिल्ह्याला तर ठाणे जिल्ह्याने पुणे जिल्ह्याला नमवत अंतिम फेरी गाठली होती.
पुरुष गटातील अंतिम लढतीत मुंबई उपनगरने पुणे जिल्ह्याला १४-१३ म्हणजे सामन्याचे एक मिनिट शिल्लक ठेवित एक गड्याने नमवित विजेतेपद पटकाविले. मुंबई उपनगरचा ओमकार सोनवणे याने २ गडी बाद केले तर पुणेच्या आदित्य गणपुलेने ४ व प्रतिक वाईकर याने ३ गडी बाद केले. उपांत्य लढतीत मुंबई उपनगरने सांगलीचा तर पुणे जिल्ह्याने ठाणेचा पराभव करत अंतिम फेरित प्रवेश केला होता. १४ वर्ष वयोगटात मुलींच्या गटात सांगली जिल्ह्याने सोलापूर जिल्ह्याला ९-७ म्हणजे दोन गड्यांनी नमवित बाजी मारली. सांगलीच्या विद्या तलखडे हिने २ गडी बाद केले. उपांत्य सामन्यात सांगलीने पुणे जिल्ह्याला तर सोलापूरने कोल्हापूर जिल्ह्याला नमवत अंतिम फेरी गाठली होती.