लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जबलपूर, मध्य प्रदेशामध्ये नर्मदा बचाव आंदाेलनाचे नेते भैयाजी सरकार यांना नागपूरच्या धंताेली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २५६ दिवसांपासून अन्नत्याग आंदाेलन केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.
जबलपूरजवळ नर्मदेच्या पात्रात भरण क्षेत्रातील अवैध बांधकाम व ३०० मीटरच्या कॅचमेंट एरियात अवैध उत्खननाविराेधात भय्याजी सरकार यांनी आंदाेलन पेटविले. नर्मदा नदीच्या काठावरील जंगल व जमीन वाचविण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. पर्यावरणाला धाेका निर्माण झाल्याने अवैध कामे थांबवून या परिसराचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी मध्य प्रदेश सरकारला केली आहे. २०१२ पासून त्यांनी आंदाेलन उभे केले असून या काळात त्यांनी तीनदा अन्नत्याग आंदाेलन केले आहे. त्यांच्या आंदाेलनाला लाेकांचा पाठिंबा वाढत आहे. पहिल्यांदा अन्न व फळांचा त्याग करीत केवळ नर्मदेचे पाणी पिऊन त्यांनी सत्याग्रह केला. त्यानंतर काही महिने अन्नत्याग आंदाेलन केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पुन्हा त्यांनी अन्नत्याग करून सरकारचे लक्ष वेधले. हा उपवास २५६ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी सरकार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जबलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथे आणखी प्रकृती बिघडल्याने दाेन दिवसांपूर्वी रात्री २.३० वाजता त्यांना नागपूरला हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरांच्या मते अनेक दिवसांपासून अन्नत्याग सुरू असल्याने कमजाेरी आली आहे. छातीत हलका त्रास व डाेके दुखत असल्याचे सांगितले आहे. आज, साेमवारी त्यांचे सीटी स्कॅन करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. भय्याजी सरकार मध्यप्रदेशमध्ये संत म्हणून परिचित असून त्यांचा माेठा शिष्यवर्ग आहे. त्यात राजकारणी व उद्याेगपतींचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.