नागपूर : आषाढी पायी वारी सोहळ्यात विदर्भातील पालख्यांचाही सहभाग करा आणि आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडू द्या, असे म्हणत वारकरी आणि आंदोलकांनी सोमवारी निर्जला एकादशीचे औचित्य साधून येथील संविधान चौकात ‘भेटी लागी जीवा’ आंदोलन केले. टोपी, धोतर, कुर्ता, कपाळावर गंध आणि टाळमृृदंगाच्या साथीने गायिलेली भजने हे या आंदोलनाचे वेगळेपण होते.
वारकरी मंडळींच्या साथीने लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती, लोकजागृती मोर्चा आणि भारतीय विचार मंचच्या वतीने हे संयुक्त आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनात वारकरी मंडळीही सहभागी झाले होते. संत तुकारामांची भजने गात आणि ‘ज्ञानबा तुकाराम’ असा गजर करीत आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विदर्भातून कौंडण्यपूरवरून दरवर्षी पायी वारी सोहळ्यात पालखी जाते. मागील वर्षीपासून यात खंड पडला आहे. भाकरे महाराजांचे शिष्यगण तीन पालख्या दरवर्षी नेतात. या सर्वांनी वारीमध्ये सहभागी होण्याची मागणी आंदोलनातून केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात अमृत दिवाण, दिलीप ठाकरे, ॲड. अविनाश काळे, रमण सेनाड, मुन्ना महाजन, सुनील किटकरू, बंडूजी वासाडे, आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.
...
आता वारीतही बॅकलॉग नको !
मानाच्या पालख्यांना वारीतील सहभागाच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, सरकारने वारीतही विदर्भाचा बॅकलॉग ठेवू नये. विदर्भातील पालख्यांनाही इतिहास आहे. त्यांचाही समावेश वारीत होणे अपेक्षित आहे. मानाच्या पालख्यांसोबतच विदर्भातील वारकऱ्यांच्याही भावनांचा विचार व्हावा. यासाठी सरकारने एक समिती नेमून निर्णय घ्यावा.
- ॲड. अविनाश काळे
...