योगेश पांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : साधारणत: सरकारी नोकरीत अधिकारीपदावर असलेली व्यक्ती ‘आपण भले आणि आपले काम भले’ या विचारातूनच काम करताना दिसून येते. मात्र समाजाला आपणदेखील काही तरी देणे लागतो या विचारातून काही अधिकारी झटत असतात. स्वत:च्या कार्यकक्षेत काम करताना ते समाजहिताचा आदर्शदेखील प्रस्थापित करतात. राज्याच्या पाटबंधारे विभागात अधीक्षक अभियंता शिरीष आपटे यांनी अशीच प्रेरणा निर्माण केली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे मरणप्राय झालेल्या मालगुजार तलावांना नवसंजीवनी देण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतला व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तलावांना नवे रुप दिले. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे प्रशासन व समाजातदेखील जागृती निर्माण झाली आहे हे विशेष.भोसले व गोंडशासनकाळात निर्माण करण्यात आलेले व ऐतिहासिक परंपरा लाभलेले मालगुजारी तलाव पूर्व विदर्भातील शेतकऱ्यासाठी एकेकाळी ‘लाईफलाईन’ होते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे या तलावांकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. अनेक तलावांमध्ये तर गाळदेखील साचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. २००८ साली शिरीष आपटे यांची भंडारा येथे लघु पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली. मूळचे भंडारा येथीलच असलेले आपटे यांनी ही बदली एक आव्हान व संधी म्हणून स्वीकारली.मालगुजार तलावांची स्थिती आणि त्यांची क्षमता जाणून असलेल्या आपटे यांनी २८ तलावांचा अभ्यास केला. यातील २२ तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. विभागातील दुसºया प्रकल्पात गाळ काढण्यासाठी उपकरणे उपलब्ध होती. केवळ डिझेलचा खर्च लागणार होता. आपटे यांनी आवश्यक त्या प्रशासकीय परवानगी घेतल्या व एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी पाच तलावांपासून सुरुवात झाली होती. या सर्व तलावांमधील साठ्यात सुमारे २ मीटरने वाढ झाली. तसेच भूजल पातळीदेखील वाढली. शिवाय शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. आपटे यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील त्यांना सन्मानित केले आहे.शासनाला मिळाली दिशाआपटे यांच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. परिसरातील भूजल पातळी वाढली. वर्षभर पीक घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला. शेतकºयांची आर्थिक स्थिती चांगली झाली. काही गावात ६ ट्रॅक्टर होते, तेथे ही संख्या ६५ वर पोहोचली. विशेष म्हणजे शासनानेदेखील हा उपक्रम गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे राबविला. जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या तलावांनादेखील या माध्यमातून नवसंजीवनी देण्यास सुरुवात झाली. शासनातर्फे तर आता यासाठी विशेष अनुदानदेखील देण्यात येत आहे. अगदी खासगी कंपन्यांनीदेखील कोट्यवधींच्या मदतीचा हात दिला.पारंपरिक सिंचन ‘गेमचेंजर’ ठरू शकतेआम्ही काम केलेल्या ३३ गावांमध्ये शिक्षणाचे चांगले पर्याय उपलब्ध झाले. शेतकºयांचे जीवनमान उंचावले. इतकेच काय तर गावाबाहेर पाणी उपलब्ध झाल्यामुळे जंगली श्वापदे मानवी वस्तीत शिरण्याचा धोकादेखील कमी झाला. या गोष्टींचा तर आम्हीदेखील विचार केला नव्हता. आपल्या देशात विविध भागांमध्ये पारंपरिक सिंचन प्रणाली उपलब्ध आहेत. माथा ते पायथा पद्धतीने पूर्व विदर्भात हजारो मालगुजार तलाव आहेत. या तलावांना नवसंजीवनी मिळाल्यास केवळ जलपातळीच वाढणार नाही, तर शेतकºयांची विविध दृष्टीने प्रगतीदेखील होऊ शकते. यासाठी शासन, समाज आणि विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत शिरीष आपटे यांनी व्यक्त केले.