भंडारा बायपास रोडच्या टेंडरचा वाद हायकोर्टात; सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: July 4, 2023 06:03 PM2023-07-04T18:03:10+5:302023-07-04T18:03:56+5:30
१७ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश
नागपूर : भंडारा बायपास रोडसंदर्भातील टेंडरचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने या कामाचा कार्यादेश संबंधित वादावरील निर्णयाधीन राहील, असा अंतरिम आदेश दिला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीसही बजावली व टेंडरच्या वादावर येत्या १७ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ भंडारा बायपास रोडचे सिमेंटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी टेंडर नोटीस जारी केली आहे.
या टेंडरसाठी नागपूरमधील आस्था आशीर्वाद बिल्डर्सला तांत्रिकृष्ट्या अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आवश्यक तांत्रिक पात्रता असतानाही वादग्रस्त निर्णय घेण्यात आला. परिणामी, वादग्रस्त निर्णय रद्द करून टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे बिल्डर्सचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे १७ कोटी ४७ लाख ३५ हजार रुपयाची कामे केल्याचे अनुभव प्रमाणपत्र आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रोहण छाबरा यांनी कामकाज पाहिले.