नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हजारो कोटींच्या सट्ट्याची खायवाडी-लगवाडी करणाऱ्या बहुचर्चित बुकींनी भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडल्याचे आणि तेथील पोलिसांनी बुकींसाठी ‘चिअर्स मॅन’ ची भूमिका वठविल्याचे उघड झाल्याने बुकी बाजारच नव्हे तर राज्य पोलीस दलातही प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून, मुंबईत त्या अनुषंगाने आज दिवसभर बैठका पार पडल्या. या पार्श्वभूमीवर, भंडाऱ्यात शुक्रवारी रात्री झालेल्या कारवाईचा अहवाल नागपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळताच संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करून त्याला आऊट करण्याची तर, पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांची भंडाऱ्यातून बदलीच्या रुपात (बदली करून) विकेट घेण्याचीही तयारी झाली आहे. वरिष्ठ सूत्रांकडून लोकमतला ही माहिती मिळाली आहे.देश-विदेशातील क्रिकेट बुकींचे हार्ट सेंटर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात सुरू असलेल्या आंतरराष्टीय क्रिकेट सामन्यात मर्लोन सॅम्युअल नामक खेळाडूशी वारंवार संपर्क करून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार मुकेश कोचर याने फिक्सींगचे प्रयत्न केले होते. येथील एका हॉटेलच्या फोनवरून सॅम्युअल आणि कोचरची बातचित टॅप करून नागपूर पोलिसांनी त्यावेळी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी मॅच फिक्सिंग प्रकरणात श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मॅच फिक्स केल्याची खळबळजनक माहिती त्यावेळी पुढे आली होती. त्यामुळे येथील बुकी आणि आंतरराष्ट्रीय सट्टा बाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचाही खुलासा झाला होता. त्यानंतर स्थानिक बुकींवर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवल्याने नागपुरातील बुकींनी हळूहळू आपले बस्तान दुसरीकडे नेले. दोन वर्षांपासून येथील बुकींनी गोंदियातील रम्याच्या माध्यमातून भंडारा येथे सेटींग करून तेथे आपली कंट्रोल रूम सुरू केली होती. त्यानंतर भंडारा शहर, जवाहरनगरसह, मौदा आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुकी बसू लागले. एका सामन्यावर ते कोट्यवधींची खायवाडी करून दिल्ली, गोवा, दुबईसह विविध ठिकाणी कटींग (लगवाडी) करीत असल्याचे समजते.भंडारा सट्टाबाजार बुकींसाठी हॉटमार्केटपोलिसांशी सेटिंग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या सिझनमध्ये भंडाऱ्याचा सट्टाबाजार देश-विदेशातील बुकींसाठी ‘हॉट मार्केट’ ठरला आहे. सध्या आयपीएलचा सिझन सुरू असल्याने भंडाऱ्यात बुकी पैशांचा पाऊस पाडत आहेत. येथूून ते गोवा, दिल्लीसह दुबई आणि बॅकाँकमध्येही कटिंग करीत आहेत. त्याची माहिती मिळाल्याने राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार बिहारी यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भंडारात जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.एकाच ठिकाणी तीन हायटेक अड्डेबुकींची दांडी उडविण्याचे आदेश थेट मुंबईतून मिळाल्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संजय पुरंदरे यांना अत्यंत गोपनीय पद्धतीने भंडाऱ्यातील सट्टा अड्ड्यांची माहिती काढण्यास सांगितले. त्यानुसार, पुरंदरेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अड्ड्यांची माहिती मिळवली. त्यानंतर शुक्रवारी रात्री भंडारा येथील म्हाडा कॉलनीत तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या तीन हायटेक अड्ड्यांवर एकाच वेळी धाडी घालण्यात आल्या. रॉयल चॅलेंज विरुद्ध पंजाब किंग्स या क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सामन्याचे बेटिंग करणाºया तब्बल १६ बुकींना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १ लाख, ४ हजारांची रोकड, २३० मोबाईलसह २६ लाख, ७९ हजारांचे कोट्यवधी रुपयांच्या खायवाडीचा पाना (नोंदी) जप्त करण्यात आला.पोलिसांचाही उडला त्रिफळाराज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी क्रिकेट सट्ट्याची कारवाई ठरली असून, त्यामुळे केवळ बुकीच नव्हे तर भंडारा पोलिसांचाही त्रिफळा उडाला आहे. या बुकींना भंडारा पोलिसांनी रान मोकळे करून दिल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याने भंडाऱ्याच्या ठाणेदाराचे निलंबन केले जाणार असल्याची माहिती एडीजी बिपीनकुमार बिहारी यांनी लोकमतला दिली. पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांचीही बदलीच्या रूपात विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. त्यालाही त्यांनी अधोरेखित केले. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अहवालाची आम्ही वाट बघत असल्याचेही एडीजी बिहारी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. तर, कारवाईचा अहवाल तयार करण्याचे काम वेगात सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. या संबंधाने भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी मोबाईल रिसिव्ह करण्याचे टाळले.नेटवर्क खोदून काढू : एडीजी बिहारीविशेष म्हणजे, लोकमतने यापूर्वी अनेकदा भंडाऱ्यात बुकींनी कंट्रोल रूम तयार केल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. या कारवाईमुळे लोकमतच्या वृत्तावर मोहोर लागली आहे. दरम्यान, या धडाकेबाज कारवाईचे आदेश देणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार बिहारी यांच्याशी लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधून चर्चा केली असता त्यांनी भंडारा-गोदिंया बुकींचे कंट्रोलरूम झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, या कारवाईनंतर देश-विदेशातील बुकींचे नागपूर-भंडारा-गोंदिया कनेक्शन खोदून काढण्याची पोलिसांनी तयारी केल्याचे ते म्हणाले. भंडाराचे पोलीस बुकींचे पंटर झाल्यासारखे या कारवाईतून दिसत असल्याचेही त्यांनी मान्य केले.