गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा :भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या राज्यातील नव्या जिल्हाध्यक्षांच्या यादीत भंडाराचाही समावेश असून येथे खांदेपालट झाला आहे. नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देत जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती करण्यासोबतच, भाजपा नेतृत्वाने एका दमात दोन निशाने साधण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकाश बाळबुधे मागील अनेक वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय आहेत. मागील आठ वर्षापासून ते जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत ५ वर्षे प्रदेश संघटनेत सक्रिय सहभाग राहीला आहे. एनजीओ स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी मार्फत जिल्ह्यात ते सक्रिय आहेत. एवढेच नाही, अलिकडेच झालेल्या कोहळी समाज विकास मंडळ नागपूरच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. माजी विक्रीकर उपायुक्त पदावरून त्यांनी २०१४ मधे स्वेच्छानिवृती घेतली होती, हे विशेष !
बाळबुधे यांची नियुक्ती करून नव्या नेतृत्वाला वाव देण्यासोबतच भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघात बळकटी आणण्याही प्रयत्न भाजपाच्या पक्षनेत्यांनी येथे केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात देण्यासाठी तसेच समाजाच्या गठ्ठा मतांचा विचार करून पक्षाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.