लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाना पटोले यांनी भाजपासह खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. प्रचारात देशासह राज्यातील नेतेमंडळी येथे दाखल होत असताना नागपूरकर नेतेही मागे नाही. नागपुरातील सर्वच पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराला बळ देण्यासाठी भंडारा-गोंदियात दाखल झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता भंडारा- गोंदिया एवढीच नागपूरकरांनाही असल्याचे दिसत आहे.भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. जाहीर सभांमधून ते भाजपाने केलेल्या लोकहिताच्या कामांचा पाढा वाचत असून काँग्रेस- राष्ट्रवादीवर संधिसाधूपणाचा आरोप करीत आहेत. प्रचारात बावनकुळे यांनी प्रत्यक्षात ५४ गावांना भेटी दिल्या आहेत. भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके हे मूळचे नागपूरचेच. फुके हे नुकतेच गंभीर आजारातून सुखरूप बाहेर आले. पण निवडणूक लागताच ते बाहेर पडले व स्वत:ला भाजपाच्या प्रचारात झोकून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखविलेली कमाल याही निवडणुकीत करून दाखविण्यासाठी ते दिवसाची रात्र करीत आहेत. आ. अनिल सोले हे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भंडारा व गोंदिया हे दोन्ही जिल्हे त्यांच्या मतदारसंघात येतात. गेल्या आठवड्यापासून आ. सोले हे देखील तळ ठोकून आहेत. प्रचार सभांच्या माध्यमातून ते मतदारांना भाजपाची साथ देण्याचे आवाहन करीत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री व नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश बंग यांच्यासह शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले आदी नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी शक्ती पणाला लावत आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक, भंडारा प्रभारी प्रफुल्ल गुडधे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह काँग्रेसचे काही नेते प्रचारात लागले आहेत. नाना पटोले यांना प्रचारात ते मोलाची साथ देत आहेत. ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे प्रशांत पवार हे काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या निकटवर्तीय मानले जातात. पटोले यांना उमेदवारी न मिळाल्याने सुरुवातीला काहीसे नाराज असलेले पवार आता पटोले यांच्यासोबत जोमाने प्रचाराला लागले आहेत. शेतकरी नेत्यांना एकत्र करून भाजपा विरोधी प्रचाराची धार तीव्र करण्यावर त्यांचा भर आहे. भंडारा- गोंदियाच्या प्रचारात नागपूरकर नेत्यांनी स्वत:ला झोकून दिल्यामुळे निकालानंतर होणाºया जय-पराजयाचे पडसादही नागपुरातही पहायला मिळतील, अशी चिन्हे आहेत.
भंडारा- गोंदिया पोटनिवडणुकीसाठी नागपूरची कुमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 9:08 PM
नाना पटोले यांनी भाजपासह खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. प्रचारात देशासह राज्यातील नेतेमंडळी येथे दाखल होत असताना नागपूरकर नेतेही मागे नाही. नागपुरातील सर्वच पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराला बळ देण्यासाठी भंडारा-गोंदियात दाखल झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता भंडारा- गोंदिया एवढीच नागपूरकरांनाही असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देनिवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे नेते डेरेदाखल : प्रचारात लावताहेत ताकद