भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:37 PM2018-03-22T20:37:28+5:302018-03-22T20:37:42+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मनाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मनाई केली.
लोकसभेच्या आगामी सर्वसाधारण निवडणुकीला काही महिनेच बाकी असल्यामुळे भंडारा-गोंदिया मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ वाढवून देण्याची न्यायालयाला विनंती केली. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब करून तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येऊ नये, असे सांगितले.
१० एप्रिल २०१४ रोजी लोकसभेची सर्वसाधारण निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १६ मे २०१४ रोजी जाहीर करण्यात आला होता. भंडारा-गोंदिया मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उमेदवार नाना पटोले विजयी झाले होते. पटोले यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी खासदारकीचा राजीनामा दिला व तो १४ डिसेंबर २०१७ रोजी मंजूर झाला. त्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. पुढील सर्वसाधारण निवडणूक २०१९ मध्येच असल्यामुळे आता पोटनिवडणूक घेऊन सार्वजनिक निधीचा अपव्यय करू नये, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघातील गेल्या निवडणुकीत ६ कोटी २८ लाख ८६ हजार रुपये खर्च झाले होते. या मतदार संघाची एकूण लोकसंख्या २१ लाख ९० हजार १० असून, संघात सहा तालुक्यांचा समावेश आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अनिल किलोर, भारतीय निवडणूक आयोगातर्फे अॅड. नीरजा चौबे तर, राज्य निवडणूक आयोगातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.