नागपूर/भंडारा : भंडाऱ्याचे सुपुत्र असलेले न्यायिक अधिकारी यानशिवराज गोपीचंद खोब्रागडे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे. गेल्या ७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकूण सहा न्यायिक अधिकारी व दोन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी केवळ न्या. खोब्रागडे विदर्भातील आहेत. न्या. खोब्रागडे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून वर आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही उच्च शिक्षणाशी संबंध आला नव्हता. न्या. खोब्रागडे यांना शिक्षणाची फार आवड होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आदर्श होते. दरम्यान, शिक्षण व कामाच्या शोधात नागपुरात आल्यानंतर त्यांना चक्क राज्याचे दोनदा महाधिवक्ता राहिलेले विधिज्ञ अरविंद बोबडे यांचा आशीर्वाद लाभला.
अरविंद बोबडे यांनी न्या. खोब्रागडे यांना स्वत:च्या घरी ठेवून घेतले व त्यांना शिकवले. न्या. खोब्रागडे यांनी त्यांच्याकडे राहून एम.कॉम. व एलएल.बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. पुढे ते परीक्षा देऊन जिल्हा न्यायाधीश झाले. दरम्यान, त्यांनी नागपूरमधील औद्योगिक व कामगार न्यायालयाचे सदस्य, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे व्यवस्थापक, अकोला, अमरावती व अन्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश यासह विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करून स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
*अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस करण्यात आलेल्या इतर विधिज्ञांमध्ये यांचा समावेश आहे*
न्यायिक अधिकारी
१ - संजय आनंदराव देशमुख
२ - महेंद्र वाढुमल चांदवाणी
३ - अभय सोपानराव वाघवासे
४ - रवींद्र मधुसूदन जोशी
५ - वृषाली ऊर्फ शुभांगी विजय जोशी
वकील
१ - संतोष गोविंदराव चपळगावकर
२ - मिलिंद मनोहर साठ्ये