नागपूर/ भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात वैमनस्य निर्माण करणारा भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबनासोबतच सूर्यवंशीविरुद्ध प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सूर्यवंशी गंभीर पोस्ट करीत होता. तो नेता, त्यांचे कुटुंबीय सोबतच धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकत होता.
याप्रकरणी शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध विविध कलमांसह आयटी ॲक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल केला. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर सूर्यवंशीवर कारवाई करण्याची मागणी झाली. त्यानंतर सोमवारी दुपारी भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशीच्या निलंबनाचा आदेश काढला.
सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे. बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली. यापूर्वीही तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता, परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नाही. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.