नागपूर : केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. आत भारत बंदच्या हाकेला नागपुरातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नागपूरच्या व्हेरायटी चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, डावे पक्ष यांचे कृषी कायद्याच्या समर्थानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांप्रति सरकारची वागणूक अतिशय वाईट असून याविरोधात आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी किसानविरोधी बील वापस लो!, तानाशाही नहीं चलेगी, किसान एकता जिंदाबादचे नारे लावण्यात आले.
दरम्यान, देशपातळीवर शेतकऱ्यांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या भारत बंदमध्ये आयोजित रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावं यासाठी किसान महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय सायकल आणि मोटार सायकल रॅली देखील काढण्यात येणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं. या मोर्चाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्यांवर पुन्हा चर्चा सुरू करावी आणि तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करावेत, असं आवाहन या ऑल इंडिया बँक ऑफिसर्स संघटनेने केलं आहे.