नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुस्लीम संघटनांशी भेटीगाठी कराव्या लागत आहेत. इतकेच नव्हे तर संघाच्या पदाधिकाऱ्यांना या देशात महागाई व गरिबी असल्याचेसुद्धा दिसून आले, अशी टीका स्वराज अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.
भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यादव म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन मिळत आहे. यात्रेला केवळ एक महिनाच झाला आहे. या महिनाभरातच देशाचे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. ही यात्रा नागपुरातून जात नसली तरी त्याचा आवाज मात्र नागपूरपर्यंत ऐकू येत आहे. त्यामुळे यात्रा कुठूनही निघाली तरी ती देशाचे चित्र बदलणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात आजवर जितकेही हुकूमशहा (डिक्टेटर) झाले. त्यांचा शेवट हा नेहमीच वाईट झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला अरुणा सबाणे, श्यामसुंदर सोनारकर, वर्षा देशपांडे, शेखर सोनारकर, मिलिंद रानडे उपस्थित होते.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात इतिहास घडवेल
भारत जोडो यात्रेला आतापर्यंत चांगले समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात ही यात्रा इतिहास घडवेल, तशी तयारी सुरू झाली आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधून ३३ यात्रा निघतील. प्रत्येक यात्रा ही देशाची संस्कृती दर्शविणारी राहील. ती महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या यात्रेत सहभागी होतील. हजारो लोक सहभागी होतील. ही यात्रा जितके दिवस महाराष्ट्रात राहील, तितके दिवस राहुल गांधी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, दक्षिणायनतर्फे गुरुवारी धनवटे नॅशनल कॉलेज येथे विविध जनसंघटनांची नागरिक सभा पार पडली. दिवसभर चाललेल्या या सभेत जवळपास ६० विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, डॉ. गणेश देवी, डॉ. सुखदेव थोरात, प्रतिभा शिंदे, मिलिंद रानडे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते.
भाजपने या देशात विद्वेषाचे विष पेरले आहे. देशात अतिशय भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देश वाचवायचा असेल तर ही परिस्थिती बदलावी लागेल. त्यासाठी आपापले मतभेद विसरून रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. 'भारत जोडो यात्रा' ही देशाला वाचवण्यासाठीच असून यात आपापले सर्व मतभेद विसरून सामील व्हा, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी सभेत केले. ते पुढे म्हणाले, ही यात्रा काँग्रेसने काढली असली तरी कुणी नेता किंवा पक्ष म्हणून आम्ही सहभागी नसून ही देशाची गरज आहे. देशाचा स्वधर्म धोक्यात आला आहे. देश तोडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांविरुद्ध देश जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
राम पुनियानी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगत असलेला धर्म माणूस तोडणारा आहे. खरा धर्म स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला माणसाला माणसाशी जोडणारा धर्म होय. आज जे सत्तेत आहेत. त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यात कुठेही सहभागी नव्हता. अशा लोकांशी आपल्याला लढावे लागेल. डॉ. गणेश देवी म्हणाले, की भारत जोडो ही पक्षापुरती लढाई नाही. ती देशाच्या हिताशी लढाई आहे. त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन अरुणा सबाने यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"