योगेश पांडे, नागपूर: लोकसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता असताना भाजपने संघटन मजबुतीवर भर दिला आहे. भाजपने ‘मिशन ३७०’ साठी महिला व नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गतच भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरातील महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी पक्षाशी जोडण्यावर भर देण्यात येत आहे. नागपुरात ४ मार्च रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने नवमतदारांनाच साद घालण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन आटोपल्यावर राज्यभरातच ‘नमो युवा चौपाल’चे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून १० लाखांहून अधिक तरुणांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचे नियोजन आहे.
२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपने तरुणांवर लक्ष केंद्रित केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. मात्र या निवडणुकीत भाजयुमो व भाजपकडून प्रत्यक्ष भेटी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देशपातळीवर नमो युवा चौपालच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. याअंतर्गत तरुणांशी संवाद साधण्यात येणार आहे. देशातील काही राज्यांत ही मोहीम सुरू झाली आहे, तर राज्यात पुढील आठवड्यात याला वेग येण्याची शक्यता आहे.
नवमतदारांकडूनच जाणून घेणार जाहीरनाम्यातील अपेक्षा
नमो युवा चौपालच्या माध्यमातून मागील १० वर्षांतील कामगिरी तरुणांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासोबतच या वयोगटातील मतदारांच्या सरकारकडून अपेक्षा व व्हिजन जाणून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्याच्या सूचना केंद्रीय पातळीवरून देण्यात आल्या आहेत.
नागपुरात एक लाख कार्यकर्ते पोहोचणार
भाजयुमोच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ४ मार्च रोजी नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील रविनगर येथील नागपूर विद्यापीठाच्या मैदानात हे अधिवेशन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, सरचिटणीस व प्रभारी सुनील बन्सल हेदेखील उपस्थित राहतील. या अधिवेशनासाठी देशभरातून १ लाख तरुण, तरुणी सहभागी होणार आहेत. यात भाजयुमोच्या सर्व राज्यांतील कार्यकर्त्यांसोबतच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचादेखील समावेश असेल. अनेक मोठ्या शहरात या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नागपुरातूनच १५ ते २० हजार तरुण-तरुणी सहभागी होतील, अशी माहिती भाजप व भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.