लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रसिक श्रोत्यांची अभिरुची संपन्न करणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. विख्यात नृत्यांगना किशोरी हंपीहोळी व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमचे पदलालित्य, शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे सुश्राव्य गायन आणि खास प्रतीक्षा असलेल्या सामवेदी गायनाने महोत्सवाचा पहिलाच दिवस श्रोत्यांना प्रासादिक श्रवणानंद देणारा ठरला. अष्टपैलू गायक व नाट्य अभिनेता डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या समारोहाचे आयोजन करण्यात आले. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारोहाचे उदघाटन आमदार अनिल सोले, राष्ट्रीय कर अकादमीचे अतिरिक्त महासंचालक राजीव कानडे, दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे शास्त्रीय संगीत गायक चंद्रहास जोशी व तबला वादक राजू गुजर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. किशोरी हंपीहोळी, त्यांची कन्या कामाक्षी हंपीहोळी आणि शिष्या सोनाक्षी डोंगरे यांच्या भरतनाट्यम नृत्याने संगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. दाक्षिणात्य शैलीतील सुबक हावभाव, सहजसुंदर भावमुद्रा व कलात्मक पदन्यासातून या कलावंतांनी नेत्रसुखद गणेश वंदना व शारदा स्तवन सादर केले.यानंतर श्रोत्यांना विशेष प्रतीक्षा असलेले ‘सामवेदातून संगीताकडे’ या अभिनव संकल्पनेवर आधारीत अभ्यासपूर्ण व रंजकतापूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका आरती अंकलीकर-टिकेकर व सहकारी कलावंतांनी सादर केले. निवेदिका रेणुका देशकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची संहिता लेखन डॉ. सुजाता व्यास आणि संगीत संयोजन शैलेश दाणी यांचे होते. कुठल्याही कलेचा उगम व विकासामागे काही सामाजिक संदर्भ असतात. ललित कलांमध्ये श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या संगीत कलेचा विकास वैदिक काळात याच सामवेदातून झाल्याचे बोलले जाते. हा एकूणच पारंपरिक संगीत प्रवास पं. कृष्णशास्त्री पळसगावकर, पं. दिनेश किरणराव पेडगावकर, पं. रविशंकर नारायणराव पांडे व पं. शिवराम यांनी सादर केला. सामवेदी सहवाद्य रुद्रवीणा वादक ज्योती गणपती हेडगे यांनी केले. निवेदनातून उलगडत गेलेला संगीत प्रकार मुर्छना, जतीगायन, धृपद, धमार च प्रचलित ख्याल गायकीतील राग कलावती, अभोगी, कानडा, सारंग, दीपक तसेच मल्हार रागातील बंदिशीसह आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आपल्या सहजसुंदर गायनानेसादर करून रसिकांना प्रासादिक श्रवणानंद प्रदान केला. अबोली गद्रे, स्वरुपा बर्वे (सहगायिका) यांच्यासह संदेश पोपटकर (तबला), शैलेश दाणी (किबोर्ड), ज्योती हेडगे (रुद्रवीणा), श्रीधर कोरडे (मृदंगम), श्रीकांत पिसे (हार्मोनियम) व विक्रम जोशी या वाद्यकलावंतांनी सहज साथ दिली. कैवल्याचे ते नक्षत्रांचे चांदणे असाच हा स्वरप्रवास होता. उदघाटन