लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. भरतनगर ते अमरावती मार्ग या दरम्यानच्या या प्रस्तावित डीपी रोडमुळे भरतवन येथील ५६८ झाडांची कत्तल केली जाणार होती. यामुळे विविध प्रजातीचे पशु-पक्षी व वनसंपदेला नुकसान होण्याची शक्यता होती. यामुळे या रस्ताच्या कामाला स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शविला होता. यासाठी आंदोलन पुकारले होते. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत ‘लोकमत’ने यासंदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. नागरिकांचा होणारा विरोध विचारात घेता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्या संयुक्त बैठकीत संबंधित प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिकांनी प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा, यासाठी महापौर संदीप जोशी यांना आवाहन केले होते. त्यानुसार जोशी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची मागणी केली होती. मेट्रो रेल्वेचे टर्नल फुटाळा तलावाजवळ न बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद होणार नाही. प्रेक्षक गॅलरी निर्माण करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे जोशी यांनी निदर्शनास आणले. याला गडकरी यांनी सहमती दर्शविली. त्यामुळे अखेर भरतवनमधून जाणारा रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रस्तावित रस्त्यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. वनसंपदेने समृद्ध असलेल्या भरतवनावर संकट आले होते. परंतु रस्ता रद्द झाल्याने संकट टळले आहे. नागरिकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
नागपुरातील भरतवनचा प्रस्तावित ५०० मीटर रस्ता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:01 AM
मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देनागरिकांच्या आंदोलनाला यश : संयुक्त बैठकीत घेतला निर्णय