पाटणसावंगी : नागपूर-सावनेर महामार्गावर पाटणसावंगी येथील उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांना मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले. गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. धनराज बळीराम वानखेडे (७०) रा. पारतलाई, ता. मोहखेड, जि. छिंदवाडा व शिवराम रामाधार चौरिया (६०) रा. बामला, ता. मोहखेड, जि. छिंदवाडा, अशी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये ट्रॅव्हल्स चालक रवी फुलसिंग मालवीय (३१) रा. पिपळा वन देवास, ट्रॅव्हल्स प्रवासी गोलू इकबाल मेवासी (२४), रा. भोपाळ, सलमान सलीम शेख (२३) रा. भोपाळ, देवेंद्र शाहू (२३), रा. भोपाळ, शबिया फिरोज शेख (२५) रा. मानकापूर, नागपूर, रामबाबू फहिरवर, (२९) रा. ओरिसा, आसू रोहिकार (२४) रा. जयताळा, नागपूर, अनुराग प्रेमसिंग यादव (२७) रा. इंदूर, संदीप कुमार मोहन शाहू (२९) रा. ओरिसा यांचा समावेश आहे.
रॉयल महाराजा कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एम.पी.३०/पी.०६८२ ही नागपूर मार्गे रायपूर येथे जात होती. याचदरम्यान आयशर ट्रक क्रमांक एम.पी.२८/जी-६६६६ हा छिंदवाडा येथून लसणाचे कट्टे घेऊन नागपूर भाजी मार्केटमध्ये जात होता. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅव्हल्सने आयशर ट्रकवर मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात आयशर ट्रकच्या मागील भागात बसलेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यासोबतच ट्रॅव्हल्स चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर आयशर ट्रक चालक फरार झाला. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह सावनेर येथील शवागृहात तर जखमींना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी व एनएचआयएच्या चमूने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून मार्ग मोकळा केला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे, कृष्णा जुनघरे करीत आहेत.