लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बाहेरगावच्या चुलत बहिणीला पार्टी देण्यासाठी गेलेल्या तरुणाची भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने कारमधील एका तरुणीचा मृत्यू झाला. बरखा हरिश खुराणा (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून अपघातात तिच्या भावासह तिघे गंभीर जखमी झाले. रविनगर चौक ते लॉ कॉलेज चाैकादरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला.
शुक्रवारी तलावाजवळ सायकल स्टोअर्स चालविणाऱ्या खुराणा कुटुंबातील बरखा आणि लक्की हरिश खुराणा (वय २२) या बहिणभावांनी त्यांची रायपूर (छत्तीसगड) येथून आलेली चुलत बहीण रिया जगन्नाथ खुराणा (वय २३) हिला पार्टी देण्याचा शुक्रवारी बेत आखला. लक्कीचा काैटुंबिक मित्र प्रेम अशोक चंदनानी (वय २०, रा. शांतिनगर) याला सोबत घेऊन लक्की, बरखा आणि रिया शुक्रवारी रात्री स्वीफ्ट कारने (एमएच २८ - एएन १७२६) वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडरवर्ल्ड या हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. मध्यरात्री १.३० च्या सुमारास ते नागपूरकडे परत येत असताना आरोपी प्रेम चंदनानी निष्काळजीपणे कार चालवू लागला. रविनगर चाैकातून लॉ कॉलेज चौकाकडे येताना त्यांची भरधाव कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर एका बाजूने धडकत बराच अंतरपर्यंत खेटून घासत गेली. त्यामुळे कारच्या एका बाजुचा चुराडा होऊन चाैघेही गंभीर जखमी झाले. त्यांना धंतोलीतील एका खासगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी बरखाला मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळाल्यानंतर अंबाझरी पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वाहतुकीस अडसर होऊ नये म्हणून अपघातग्रस्त कार दुसरीकडे हलविली आणि रुग्णालयात जखमीचे बयाण नोंदविले.
---
आरोपीला अटक अन् सुटका
जखमींच्या बयानावरून आरोपी प्रेम चंदनानी हा अत्यंत हलगर्जीपणाने आणि वेगात कार चालवित होता, असे स्पष्ट झाले. त्यामुळे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी त्याला अटक केली. त्यालाही अपघातात जखमा झाल्याच्या कारणावरून नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.
---