नागपूर : वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार पुलावरून नाल्यात काेसळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आठवर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा-पाटणसावंगी मार्गावरील गुमगाव मॅगनिज खाणीजवळ साेमवारी (दि. १७) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये कारचालक किशोर रामचंद्र दोरखंडे (४३, रा. बजरंगनगर, नागपूर), सूरज रामचंद्र दोरखंडे (४०, रा. जुना सुभेदार, नागपूर), सुधांशू सूरज दाेरखंडे (८, रा. जुना सुभेदार, नागपूर), गुलाब वारलू जांभूळकर (६१, रा. न्यू कैलासनगर, नागपूर) व अनिकेत गुलाब जांभूळकर (२७, रा. न्यू कैलासनगर, नागपूर) या पाच जणांचा समावेश आहे.
हे सर्व जण एमएच-४९/बीआर-३१८८ क्रमांकाच्या कारने नागपूरहून पाटणसावंगी (ता. सावनेर) मार्गे खापा येथे येत हाेते. ते गुमगाव मॅगनिज खाणीजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावर पाेहाेचताच चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट पुलावरून नाल्यात काेसळली. माहिती मिळताच ठाणेदार अजय मानकर व त्यांचे सहकारी तसेच हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी हितेश बन्साेड व नागरिकांच्या मदतीने कारमधील पाचही जखमींना बाहेर काढले.
हितेश बन्साेड यांनी जखमींना लगेच खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर सर्वांना नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये भरती केले. सर्वजण गंभीर जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पाेलीस कर्मचारी अंकुश लाखे करीत आहेत.
नाल्यावरील पूल धाेकादायक
खापा - पाटणसावंगी मार्ग वर्दळीचा असून, या मार्गावरील पुलावरून आजवर अनेक वाहने नाल्यात काेसळली आहे. हा पूल कमी उंचीचा असून, त्याला सुरक्षा कठडे अथवा सिमेंट भिंती नाहीत. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यास वाहन थेट नाल्यात काेसळले. शिवाय, पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रत्येक वेळी किमान तीन ते चार तास वाहतूक खाेळंबते. या नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करून त्याला संरक्षक कठडे लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु स्थानिक लाेकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे कधी लक्षच दिले नाही.