Maharashtra Election 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाट्याला आला आहे. पण, काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला. कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी काँग्रेसला सुनावले.
नागपूर येथे माध्यमांशी भास्कर जाधव यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना रामटेकमधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
भास्कर जाधवांचा काँग्रेसवर निशाणा
भास्कर जाधव म्हणाले, "मी याकडे दुःखाने, वेदनेने बघतो. पूर्व विदर्भात २८ जागा आहेत. यापैकी १४ जागा भाजप शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकल्या होत्या. त्यातील किमान ८ ते १० जागा मिळतील, असा माझा अंदाज होता, प्रयत्न होता. पण, केवळ १ जागा मिळाली. त्याही जागेवर काँग्रेसने बंडखोरी करावी आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी ती बंडखोरी करावी आणि आजपर्यंत काँग्रेसने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये याच्यासारखं वेदनादायी प्रकरण दुसरं नाही."
त्याची आठवण तुम्ही अशी ठेवली?, काँग्रेसला सवाल
"कारवाईची मागणी कशाला करायला पाहिजे? काँग्रेसची स्वतःची नैतिक जबाबदारी नाही का? एका जागेवर तुमचा जिल्हाध्यक्ष अशा पद्धतीने बंडखोरी करतो. तुम्ही कळमेश्वरला जाहीरपणे सांगता की, आम्हाला तुम्ही दिलेली लोकसभेची जागा आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्ही ही त्याची आठवण ठेवली", असा संताप भास्कर जाधव यांनी काँग्रेसबद्दल व्यक्त केला.
"माझं तर म्हणणं असं आहे की, या बंडखोरीच्या मागे इथले काँग्रेसचे काही नेतेमंडळी आहेत. म्हणून ही बंडखोरी झालेली आहे. आमच्या पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. आमच्या उमेदवाराला फटका बसेल की नाही, हे मतदार ठरवतील; पण, असं मैत्रीमध्ये, आघाडीमध्ये वर्तन चांगलं आहे, असं मला वाटतं नाही. हे वर्तन सातत्याने काँग्रेसकडून होतंय, असा माझा आरोप आहे", अशा शब्दात भास्कर जाधवांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
अशी दगाबाजी मान्य नाही -भास्कर जाधव
"विशाल बरबटे हे निवडून येतील. पण, निवडून येत असताना मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणे, हे मला मान्य नाही", असे भास्कर जाधव काँग्रेसच्या भूमिकेबद्दल म्हणाले.