निशांत वानखेडे
नागपूर : डीएनएप्रमाणेच आरएनए (रायबाेन्युक्लिक ॲसिड) हा मानवाप्रमाणे सर्व सजीवांच्या शरीरातील अतिमहत्त्वाचा सूक्ष्म घटक. हा घटक प्रयाेगशाळेत तयार करून वैज्ञानिकांनी वैद्यकीय संशाेधनात क्रांती केली आहे. अशाच संशाेधनात गडचिराेली जिल्ह्यातील भास्कर हलामी या संशाेधकांचे नाव जुळते आहे. हे भास्कर सध्या अमेरिकेच्या वाॅशिंग्टनजवळ मेरिलॅंडस्थित प्रयाेगशाळेत आरएनएवर संशाेधन करून कॅन्सर, फायब्राेसिस, अल्झाईमर, हायपर टेन्शन यांसारखी औषधे शाेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गडचिराेलीसारख्या दुर्गम भागातून सुरू झालेला भास्कर यांच्या आयुष्याचा प्रवास व्हाया नागपूर हाेत अमेरिकेपर्यंत पाेहोचला आहे. सध्या ते ‘सिरनाॅमिक्स’ कंपनीत प्रमुख वैज्ञानिक म्हणून कार्य करीत आहेत. भास्कर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांच्या संशाेधनावर प्रकाश टाकला. डीएनए व आरएनएचे संयाेजन असलेल्या ‘ओलिगाेन्युक्लिओटाईड’ हा त्यांच्या संशाेधनाचा केंद्रबिंदू. कंपनीसाेबत काम करताना दीड वर्षात त्यांनी वेगवेगळ्या संयाेजनाद्वारे १० हजारांवर कृत्रिम आरएनए तयार केले. हे आरएनए पुन्हा प्रयाेगशाळेत टेस्ट केले जातात. मग प्राण्यांवर चाचणी, नंतर मानवी चाचणीत यशस्वी झाले की अंतिम रूप देऊन माेठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. काॅम्बिनेशन चुकले की पुन्हा प्रयत्न. काही प्रयाेग यशस्वी झाले असून, त्याची मानवी चाचणी सुरू आहे व एक-दाेन वर्षांत रिझल्टही मिळतील. पीएच.डी.दरम्यान गाईडच्या मार्गदर्शनातील संशाेधनाला पेटेंट मिळण्यासह वेगवेगळ्या विद्यापीठांचे काही पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
६० कंपन्यांची ऑफर नाकारली
२०१३ ते २०१९ पर्यंत मिशिगन टेक्नाॅलाॅजिकल विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना अनेक कंपन्यांची ऑफर येऊ लागली. अमेरिकेत ४०० च्या घरात कंपन्या आहेत आणि जीवशास्त्र व रसायनशास्त्रात सखाेल ज्ञान असलेल्यांची संख्या कमी आहे. भास्कर यांनी दीड वर्षे दुसऱ्या कंपनीतही सेवा दिली; पण संशाेधनाला वाव नसल्याने त्यांनी ती साेडली. या काळात त्यांना ६० ते ७० कंपन्यांची ऑफर आली; पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली. त्यांच्या कंपनीतील संशाेधन कार्याचे ते प्रमुख असून, आधी पीएच.डी. झालेले संशाेधक त्यांच्या हाताखाली कार्य करीत आहेत. जीवरसायन क्षेत्रात संशाेधकांची वानवा असल्याचे ते सांगतात.
एलआयटीच्या विद्यार्थ्यांकडून दिशा मिळाली
बीएड झाल्यानंतर २००३ साली नागपूरच्या एलआयटी काॅलेजला अप्लाईड ऑर्गेनिक केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून नाेकरी स्वीकारली. १० वर्षे येथे सेवा दिली. या काॅलेजचे विद्यार्थी खराेखर हुशार असतात. त्यांना पाहताना आपणही वेगळा मार्ग निवडावा अशी घालमेल सुरू झाली. युपीएससीची तयारीही केली व मुख्य परीक्षेत मजल मारली. मात्र, त्यानंतर पीएच.डी. करावी, असा निर्धार केला. सुदैवाने आदिवासी मंत्रालयाची परदेशी शिष्यवृत्ती मिळाली आणि अमेरिकेला जाण्याची हिंमत आली. जीआरई, टाॅफेल या दाेन्ही परीक्षा उत्तीर्ण करून मिशिगन विद्यापीठात पीएच.डी.चा प्रवास सुरू झाला.
विज्ञान संस्थेने दृष्टिकाेन व्यापक झाला
भास्कर यांचे प्राथमिक शिक्षण गडचिराेलीच्या एटापल्ली तालुक्यातील कसनसूर या गावी झाले. पुढे यवतमाळच्या केळापूर येथून दहावीपर्यंत. पुढे गडचिराेली बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सीला प्रवेश घेतला. हाॅस्टेलमध्ये निवासाची व्यवस्था झाली. पहिल्यांदा माेठ्या शहरात शिकायला आलाे हाेते. पहिल्या दिवशी चक्क स्लिपरवर काॅलेजला गेलाे हाेताे. मित्रांच्या सूचनेनुसार भावाचे जुने शूज आणले. बाबांची स्थिती बेताचीच असल्याने जेवणापुरते पैसे मिळायचे. मात्र, अशावेळी हाेस्टेल व काॅलेजच्या मित्रांचा माेठा आधार मिळाला. प्रत्येक अडचण दूर हाेत गेली. प्राध्यापकांचे मार्गदर्शन माेलाचे ठरले. ते सुवर्ण दिवस हाेते. आयुष्याचा दृष्टिकाेन व्यापक हाेत गेल्याची भावना भास्कर यांनी व्यक्त केली.