लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुतांश भारतीय सणांना पौराणिक इतिहास लाभला आहे. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण सुभद्रेकडे गेला आणि सुभद्रेने औक्षण करून कृष्णाचे पूजन केले तर, यमराजाने यमुनेकडे जाऊन तिला भेटवस्तू दिल्या आणि औक्षण करवून मनसोक्त भोजन केले, तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया. तेव्हापासून या दिवसाचे हे अत्यंत पवित्र महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली. रमा एकादशीपासून सुरू झालेला सहा दिवसाच्या दीपोत्सवाचा समारोप या दिवसाने होतो. लक्ष्मीपूजन आटोपताच दुसऱ्याच दिवशी बंधूंनी आपापल्या भगिनींकडे प्रयाण केले आणि मंगळवारी ओवाळून घेतले. यामागे बंधूरांयाचे आयुष्य वाढावे, त्याच्या आयुष्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये, त्याची भरभराट व्हावी अशी मनोमन प्रार्थना भगिनी करत असतात. त्याच अनुषंगाने लक्ष्मीपूजनानंतर बहीणभावांच्या या पवित्र क्षणांचा सोहळा साजरा करण्याची लगबग घरोघरी दिसून येत होती. मोठ्यांसोबतच लहानांनीही भाऊबीज साजरी करत हा सण पुढच्या पीढित हस्तांतरित करण्याची परंपरा जपली. अनेकांच्या घरी तर सोहळ्यागत हा सण साजरा झाला. तेलदिव्यांचा प्रेरक प्रकाश, विद्युत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा गजर आणि सुरेल गाण्यांची मैफिलही या निमित्ताने रंगल्याचे दिसून येत होते. ज्या कुटूंबात आजही संयुक्त कुटूंबपद्धती जपली जात आहे, अशा घरी तर जणू कौटुंबिक मेळावाच भरला होता. जे कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्ताने वेगवेगळे एकल कुटुंब पद्धतीमध्ये स्थिरावले, ते सुद्धा मानाने मोठे असलेल्या भावांच्या-भगिनींच्या घरी जमले होते. ज्यांना भाऊ नाहीत, त्यांनी चंद्रालाच भाऊ मानत ओवाळणी घातली आणि याच कारणामुळे चंद्राला ‘चांदोबामामा’ का म्हणतात अशी माहिती घरातील चिमुकल्यांना दिली. विशेष म्हणजे, ऐन दिवाळीत पावसाचा जोर सुरू असताना आणि ढगांचा राबता असताना, भाऊबीजेला मात्र आकाश मोकळे झाले. जणू, वरुणराजाला आणि ढगांनाही बहीणभावांच्या नात्याचे अनुपम असे क्षण अनुभवयाचे असावे. त्यातच, काहींनी वृद्धाश्रम, अनाथाश्रमात जाऊन कुणी बहीण तर कुणी भाऊ शोधत हा सण साजरा केला. एकूण, दीपावलीचा हा भावनिक सोहळा उत्साहात साजरा झाला.
चंद्राचे चांदणे डोकावले बहिणींच्या घरी अन् साजरी झाली भाऊबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 10:50 PM
कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली.
ठळक मुद्देयमद्वितीयेला चंद्रकोरीसंगे बहिणींनी घातली भाऊरायांना ओवाळणी