लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आंबेडकरी आणि रिपब्लिकन चळवळीला दिशा देणारे मार्गदर्शक डॉ. भाऊ लोखंडे हे आंबेडकरी चळवळीचे खऱ्या अर्थाने लढवय्ये नेते हाेते, असा सूर डॉ. भाऊ लोखंडे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेत निघाला. यावेळी भाऊ लोखंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळाही देण्यात आला.
डॉ. भाऊ लोखंडे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बुधवारी लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
प्रा. रणजित मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाऊ लोखंडे यांच्या एकूणच वक्तृत्व व कर्तृत्वाचा आढावा घेतला. त्यांना भाषणबाज म्हटले जायचे, परंतु हजारो आणि लाखो लोकांच्या समोर अभ्यासपूर्ण आपले विचार ठामपणे मांडणे
हे साधे काम नाही. पुस्तकांच्या माध्यमातून अनेकांनी आपले डॉक्युमेंट तयार केले, परंतु भाऊसाहेबांनी मात्र पुस्तकांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार मांडण्याचेच कार्य केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ताराचंद्र खांडेकर म्हणाले, भाऊसाहेबांनी अनेक आंदोलने केली. विद्यार्थी फेडरेशनमध्ये अनेक आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले. डॉ. धनराज डहाट, इ. मो. नारनवरे यांनीही भाऊ लोखंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अश्वघोष भाऊ लोखंडे व करुणा लोखंडे व्यासपीठावर होते. प्रास्ताविक ई. मो. नारनवरे यांनी केले. संचालन बाळू घरडे यांनी केले.
- बॉक्स
अपूर्ण व अप्रकाशित ग्रंथसंपदा प्रकाशित व्हावी
भाऊ लोखंडे यांनी भरपूर लेखन केले आहे. त्यांचे लेखन हे अभ्यासपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे त्यांची अपूर्ण राहिलेली साहित्य संपदा प्रकाशित व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.