लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरीत आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही. निवड करुन सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. यंदादेखील असेच व्हावे असा संघाचा प्रयत्न आहे.२०१२ व २०१५ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची फेरनिवड व्हावी असे संघ वर्तुळातील अनेकांची इच्छा आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि संघप्रणित संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी,व्ही.भागय्या, डॉ.कृष्णगोपाल यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातही होसबळे यांचे नाव आघाडीवर आहे.सरकार्यवाहच मुख्य प्रशासकसंघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत. तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात. तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.