नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना. गावातील काही जातीवाद्यांनी भोतमांगे कुटुंबातील चौघांना क्रूरपणे ठार मारले. या हत्याकांडाचा एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे. त्या घटनेपासून आतापर्यंत न्यायासाठी सतत संघर्ष करीत जगलेल्या भैयालाल यांनी न्याय मिळण्याआधीच जगाचा निरोप घेतला. खैरलांजी हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा व्हावी व भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी झालेल्या विराट आंदोलनाचे केंद्रबिंदू नागपूर ठरले. त्यामुळे अंत्यसंस्कारापूर्वी नागपूरकरांना भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सीताबर्डीच्या आनंद बुद्धविहार येथे ठेवण्यात आले होते़ शनिवारी सकाळी ९.१५ च्या दरम्यान त्यांचे पार्थिव मेडिकल रुग्णालयातून आनंद बुद्धविहारात आणण्यात आले. येथे नागरिक सकाळपासून जड अंतकरणाने उभे होते़ भैयालाल यांचे पार्थिव एक तास विहारात ठेवण्यात आले. त्यावेळी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह रवी शेंडे, राजन वाघमारे, भैयाजी खैरकर, सचिन मून, अरुण साखरकर, रमेश कांबळे, मायाताई शेंडे, उत्तम शेवळे, नितीन फुलमाळी, दिनेश अंडरसहारे, मानवाधिकार आयोगाचे सी.एम. थुल, राजू लोखंडे, बबलू कडबे, प्रमोद जोंधळे, हेमंत भोतमांगे, तक्षशिला वाघधरे व समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा उज्ज्वला गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार प्रकाश गजभिये यांनीही अंत्यदर्शन घेतले. भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी वंदना घेतल्यानंतर भैयालाल भोतमांगे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपब्लिकन गटांचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी यावेळी भैयालाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १०.३० वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव भंडाऱ्याकडे रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी) विशेष वकिलाची व्यवस्था करू : बडोले खैरलांजी हत्याकांडाच्या न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र निर्णय लागण्याआधी त्यांचे निधन होणे ही दु:खद घटना आहे. तरीही समाज आणि सरकार त्यांचा लढा थांबविणार नाही. या प्रकरणात न्यायालयात सुनावणीसाठी सरकारतर्फे विशेष वकिलाची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भैयालाल यांच्या श्रद्धांजली सभेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जातीयता, विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरोधात लढा दिला. मात्र समाजात आजही ही विषमता कायम आहे. खैरलांजी हत्याकांड हे त्याच विषमतेमुळे घडले आणि भैयालाल त्या संघर्षाचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने न्यायालयीन लढ्याचे नुकसान झाले आहे. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई संपणार नाही. पण न्याय पहायला ते आपल्यात नाही, याची खंत वाटत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भैयालाल यांच्या अंत्यदर्शनावेळी हळहळले समाजमन
By admin | Published: January 22, 2017 2:24 AM