नागपूर : कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल करत पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे, तसेच संरक्षण भिडे व एकबोटे यांना मिळत आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर राज्यात बंद पाळण्यात आला. काही आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून अनेकांना उचलून नेले. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अॅड. आंबेडकर यांनी मंगळवारी नागपुरातील दलित, ओबीसी यासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत रविभवन येथे चर्चा केली. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये तालिबानी संघटनांनी जसा आपला प्रभाव निर्माण करून सरकारला दुबळे केले आहे.हाफीज सईदसारख्या दहशतवाद्याला तेथील सरकारच संरक्षण देत आहे. तशीच परिस्थिती भारतात निर्माण होत असून, येथे हिंदू संघटनांचा हिंसाचार वाढत आहे. भिडे व एकबोटे हे महाराष्ट्रातील हाफीज सईद असल्याची टीका त्यांनी केली.आयोग का नेमला नाही?कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आयोग नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्याची स्थापना का केली गेली नाही, असा सवाल करीत चौकशी आयोग स्थापन केला नाही तर ओबीसी समाजातील उद्रेक बाहेर येऊ शकतो. याची सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.एल्गार परिषदेत कुणीही माओवादी नव्हते आंबेडकर म्हणाले, पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत कुणीही माओवादी नव्हते. न्या. पी.बी. सावंत, न्या. बी.जी. कोळसे पाटील यांच्यासह आपणही त्या परिषदेला उपस्थित होतो. मला जर कुणी माओवादी म्हणत असेल तर हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.उमर खालीद देशद्रोही नाहीएल्गार परिषदेत उमर खालीद यांच्या उपस्थितीवरून आक्षेप घेण्यात आले, यावर आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपांतून उमर खालीद यांना मुक्त केले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्यांना परिषदेत बोलावून आयोजकांनी कोणतीच चूक केलेली नाही.