नागपूर : वडील देशसेवेसाठी बॉर्डरवर असताना आई वंदना यांनी तिन्ही मुलांचा सांभाळ केला. २००१ मध्ये वडील नंदकुमार यांचा सैन्यसेवेचा (हवालदार) कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी शेती केली. भिष्णूरच्या जिल्हा परिषदेत शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय प्रतीक कोरडे याने ६३८वा रँक मिळवित केंद्रीय लोकसेवा आयोगाचा टप्पा सर केला. यावर समाधान व्यक्त करीत प्रतीक याने आयएएस होण्याचे मिशन कायम ठेवले आहे.
नरखेड तालुक्यातील प्रतीक कोरडे याने युपीएससीचा टप्पा सर केल्यानंतर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, युपीएससीचा हा टप्पा सर करताना प्रतीक याची संघर्षकथा प्रेरणादायी आहे. वर्ग १ ते ४ भिष्णूरची झेडपी शाळा, पाचवी व दहावीपर्यंत नरखेडच्या नगरपरिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रतीकला दहावीत ८१ टक्के होते. नागपुरातील पटवर्धन हायस्कूल येथे त्याने ११ आणि १२ वीत पर्यंतचे शिक्षण घेतला. विज्ञान शाखेत ७६ टक्के गुण मिळविणाऱ्या प्रतीकला सैन्य दलात अधिकारी व्हायचं होतं. पुढे पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये ६७ टक्के गुण मिळवित बीएससी केल्यानंतर प्रतीक याने करिअर म्हणून युपीएससीला प्राधान्य दिलं. २०२१ला आजारामुळे प्रतीकला युपीएससीचा टप्पा गाठता नाही. २०२२ मध्ये त्याने हा टप्पा गाठला.
बहीण पूनम आहे पोलिस अधिकारी
प्रतीक याची मोठी बहीण पूनम कोरडे यांनी राज्य लोकसेवा आयोगाचा टप्पा गाठत स्पर्धा परीक्षेत दमदार यश मिळविले होते. त्या सध्या काटोल पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. याशिवाय मधली बहीण प्रियंका ही वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवा करते.
वडिलांनी विपरित परिस्थितीत आमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी कंपनीत सेक्युरिटी विभागात काम केले आहे. भिष्णूर माझ्या वडिलांची कर्मभूमी आहे. येथून माझे प्राथमिक शिक्षण झाले. माझ्या यशाचे शिल्पकार आई-वडील आहेत. आता पुढील टार्गेट ‘आयएएस’ हेच आहे.
-प्रतीक कोरडे, नरखेड