नगरपंचायत लक्ष देईना
भिवापूर : शहर व गावखेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विविध फलक लावलेले असतात. त्यावर ‘सुंदर रस्ता, गावाचा गुलदस्ता’ अशा एक ना अनेक मनाला भावणाऱ्या ओळी लिहिलेल्या असतात. मात्र प्रत्यक्षात पुढे काय तर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे याच रस्त्यांचे बारा वाजलेले असतात. शहराचा प्रभाग असलेल्या भूदान रस्त्यावर त्याचेच प्रतिबिंब दिसत आहे. उन्हाळा व हिवाळ्यात खड्डेयुक्त प्रवास तर पावसाळ्यात घसरगुंडीचा प्रवास नागरिकांच्या जिवावर उठला आहे.
भिवापूर शहरातील प्रभाग क्र.२ मध्ये भूदान ही अंदाजे शंभर लोकसंख्येची वस्ती आहे. शहरापासून अंदाजे दोन कि.मी. अंतरावर वसलेल्या लोकवस्तीकडे नगरपंचायत प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा येथे वेशीवर टांगल्या आहेत. अभयारण्याने प्रभावित असलेल्या या जंगलव्याप्त प्रभागात जायला धड रस्ता नाही. शहरापासून अर्ध्या अंतराचा रस्ता डांबरीकरण असून त्यानंतर मात्र रस्त्याची दुर्दशा झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही नगरपंचायत प्रशासन रस्त्याच्या दैन्यावस्थेकडे बघत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत पाणी साचलेले आहे; तर संपूर्ण रस्ता चिखलाने माखलेला आहे. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी रस्त्यावर घसरून पडत आहेत; तर पाण्याने तुंबलेले खड्डे दिसत नसल्यामुळे अनेकजण दुचाकी व सायकलीसह खड्ड्यात पाय पडून जखमी होत आहेत. रस्त्याचे डांबरीकरण गत तीन ते चार वर्षांपासून रखडलेले आहे. जंगलव्याप्त रस्त्यावर दिवाबत्तीची सोयसुद्धा व्यवस्थित नाही. त्यामुळे अंधारात बुडालेल्या रस्त्यावर घसरगुंडीच्या जखमा खात नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
निवेदनाचा उपयोग काय?
याबाबत गत दाेन वर्षांपासून येथील नागरिक नगरपंचायतीला सतत निवेदने देत आहे. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आमदार राजू पारवे यांनाही नुकतेच निवेदन देण्यात आले असून भूदानला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ करण्याची मागणी रवींद्र वारकर, माणिक रामटेके, शामसुंदर येवले, सुरेश येवले, अमोल मेश्राम, बबन येवले, आदींनी केली आहे.
250921\img-20210917-wa0052.jpg
भुदान या शंभर लोकसंख्येच्या प्रभागाला जोडणारा हा रस्ता असा घसरगुंडी झाला आहे.