भिवापूर : ‘ते’ दुकानात येतात. दोन हजार रुपयाची नोट दाखवितात. साहित्य खरेदी करतात. दुकानदार दुसऱ्या ग्राहकांत गुंतताच सदर ग्राहक ‘ती’ नोट व साहित्य दोन्हीसह पोबारा होतात. शहरात एक नव्हे चार ठिकाणी असा प्रकार घडला. दुकानदार सतर्क असल्यामुळे या टोळीला अद्याप तरी यश आलेले नाही. मात्र नागरिक व पोलीसांनी आता सावध व सतर्क होणे आवश्यक आहे.
धर्मापूर पेठेतील अमोल वारजूरकर यांच्या स्पोर्ट साहित्याच्या दुकानात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक महिला व पुरुष ग्राहक आलेत. एक ना अनेक साहित्य त्यांनी बघितले. एक दोन साहित्य खरेदी करत त्यांनी चक्क दोन हजार रुपयांची नोट दुकानदाराला दिली. उर्वरित रक्कम परत करताच, आम्हाला पाचशेच्या नोटा पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. यादरम्यान अन्य दोन अनोळखी ग्राहकही दुकानात आले. त्यांनीही एक ना अनेक साहित्य बघणे सुरू केले. दुकानदार त्यांच्यात गुंतल्याचे लक्षात येताच ‘त्या’ महिला व पुरुष ग्राहकांनी दोन हजार रुपयाची नोट, साहित्य व दुकानदारांनी परत केलेली उर्वरित रक्कमेसह दुकानातून काढता पाय घेतला. लागलीच अन्य दोन ग्राहकही खरेदी न करताच दुकानातून बाहेर पडले. ही बाब दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी झटपट निघालेल्या ‘त्या’ महिला व पुरुष ग्राहकाला बोलाविले. आरडाओरड झाल्यास गडबड होईल या भीतीने ते ग्राहकही माघारी फिरकले आणि दुकानदाराला रक्कम व साहित्य दोन्ही परत केले. या घटनेचा कानोसा घेतला असता गत आठवडाभरात शहरात चार ठिकाणी अशा घटना घडल्याचे सांगण्यात आले. मात्र दुकानदारांच्या सावधतेमुळे या टोळीला अद्याप तरी त्यात यश आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे या टोळीतील चारही जणांचे चेहरे स्थानिकांसाठी अनोळखी आहे. त्यामुळे बाहेरील टोळी शहरात सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांची गस्त वाढली
सध्या तरी शहरात व तालुक्यात चोरीच्या घटनांची नोंद नाही. मात्र उमरेड येथे व्यापाऱ्याच्या घरात झालेला दरोड्याचा प्रयत्नाची भिवापूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरात व विशेषत: मार्केट परिसरात २४ तास गस्त सुरू केली आहे. संशयास्पद व्यक्तीच्या हालचालीवरदेखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.