भिवापूर : अपुऱ्या मनुष्यबळावर गावखेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी सुरू आहे. मात्र, भिवापूर शहरात पूर्णत: बंद आहे. अशात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना थेट भिवापूर ते सोमनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचा हा प्रताप अनेकांना संताप आणणारा असून, हे रुग्णालय आहे की मरणालय असा प्रश्न विचारला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभावित तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाने सर्व खाजगी दवाखान्यांना पत्र पाठवून संशयित रुग्णांना कोविड तपासणीचा सल्ला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या शहरात डेंग्यूसह व्हायरल फिव्हरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांत काही प्राथमिक लक्षणे आढळल्यास खाजगी डॉक्टर त्यांना कोविड तपासणीचा सल्ला देत आहेत. मात्र, शहरात कोविड तपासणी केंद्रच बंद असल्यामुळे स्थानिक रुग्णांना सोमनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविले जात आहे. यापूर्वी गावखेड्यातील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक रुग्ण उपचारासाठी व कोविड तपासणीसाठी तालुकास्तरावर भिवापूरला यायचे. मात्र, आता शहरातील रुग्णांना बाहेरगावात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या या एकंदरीत कारभाराबाबत नागरिकांत नाराजी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रच बरे
तालुका आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात नांद, जवळी, सोमनाळा हे तीन प्राथामिक आरोग्य केंद्र आहे. उपचाराच्या दृष्टीने येथे साधनसामग्री व मनुष्यबळाचा अभाव असला तरी आहे त्या संसाधनाच्या बळावर आरोग्य सेवा पुरविली जात आहे. आरोग्य सेवकांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून कोविड तपासणी केली जात आहे. या तुलनेत ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बरी असतानासुद्धा केवळ जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे.
---
कोविड सेंटर व तपासणी केंद्रातील कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त केल्यामुळे शहरात कोविड तपासणी बंद आहे. याबाबत सोमवारी बैठक आयोजित केली असून, यावर तोडगा काढला जाईल.
अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर
310721\img-20210225-wa0038.jpg
प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा