लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेनावर मात करत, तिसरी लाट थाेपविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद मंदावला असून, लसीकरणाची ही गाडी आता २० हजारांवर थांबली आहे. त्यामुळे लसीकरण वाढीसाठी लोकप्रतिनिधींनी एक पाऊल पुढे टाकावे. शासनाने लसीकरण सक्तीचे करावे, असा सूर आळवला जात आहे.
तालुक्यात आतापर्यंत १८,१६९ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर केवळ २,४९० जणांना दुसरा डोस मिळाला. दुसऱ्या डोसची मागणी मोठी असली, तरी ८४ दिवसांच्या अटीमुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे १८ वर्षांवरील तरुण पहिल्या डोसची मागणी करीत आहेत. मात्र, फ्रंटलाइन वर्कर वगळता इतरांना लस द्यायला आराेग्य यंत्रणा तयार नाही, तर लसीकरणाच्या गैरसमजामुळे बहुतांश ४५ वर्षांवरील नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. यात ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशात जास्तीतजास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या आवाहनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, सामान्य नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणारे आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्यांनी लसीकरणाच्या वाढीसाठी पुढाकार घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात जनजागृती व नागरिकांना प्राेत्साहित करणे आवश्यक आहे. शासनाने नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर मिळणारे दाखले, स्वस्त धान्य वितरण, विविध शासकीय अनुदानित योजनांचा लाभ देताना लसीकरण सक्तीचे करावे, असा सूर आराेग्य क्षेत्रातून व समाज माध्यमातून उमटत आहे.
.....मोखाळा येथे लसीकरणास प्रतिसाद
प्रत्येक गावात लसीकरण प्रभावी होण्यासाठी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण राऊत प्रयत्नरत आहेत. मोखाळा येथे मर्यादित दिवसांकरिता लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यात ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. येथे लसीकरण करणाऱ्या पथकामध्ये डॉ.रोसीना मोहन्ना, अरुणा लांडगे, शिक्षक रामराव टोंग, बंडू कुळमेथे, भास्कर कडू, स्नेहलता वंजारी, निर्मला देवाळकर आदींचा सहभाग होता.
===Photopath===
250521\img-20210518-wa0096.jpg
===Caption===
मोखाळा येथील लसीकरण केंद्रावर लस घेतांना महिला