लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे भूमिपूजन सोमवारी हनुमाननगर येथील क्रीडा चौकात असलेल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले.यावेळी, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, माजी खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी आ. डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, छोटू भोयर, ईश्वर देशमुख महाविद्यालयाचे सूर्यकांत जऊळकर उपस्थित होते.या पटांगणावर २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधित हा महोत्सव पार पडणार आहे. धार्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात येणार असून, महोत्सवाच्या शुभारंभाला एक हजार कलावंतांच्या सहभागाचा ‘सूर-ताल संसद’ हा कार्यक्रम रंगणार आहे. भूमिपूजनाच्या वेळी डॉ. दीपक खिरवडकर यांनी, या महोत्सवामुळे विदर्भाच्या सांस्कृतिक विकासात मोठी भर पडल्याची भावना व्यक्त केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची नागपूरकरांना मेजवानी मिळणार आहे़ १७ दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात दोन हजार स्थानिक व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.हे कार्यक्रम होणारमहोत्सवात २९ नोव्हेंबरला एक हजार कलावंतांचा ‘सूर-ताल संसद’, ३० नोव्हेंबरला ललित दीक्षित, शान व साधना सरगम यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’, १ डिसेंबरला सुरेश वाडकर, ३ ते ५ डिसेंबर ला ‘रणरागिणी राणी लक्ष्मीबाई’ महानाट्य, ६ डिसेंबरला डॉ. भीमराव आंबेडकर महानाट्य, ७ डिसेंबरला शैलेश लोढा व चमूचे कविसंमेलन, ८ डिसेंबर रोजी ‘मैं लता - म्युझिकल कॉन्सर्ट’, ११ डिसेंबरला ‘आनंदवनभुवनी’, २३ डिसेंबरला ‘महारथी कर्ण’ भावनाट्य, १३ डिसेंबरला ‘युगपुरुष - स्वामी विवेकानंद’ संगीत नाटक, १४ डिसेंबरला जावेद पाशा व चमूचे ‘मिरॅकल ऑफ व्हील्स’ आणि १५ डिसेंबरला हेमामालिनी यांच्या ‘माँ गंगा’ने समारोप होईल. दरम्यान ९ डिसेंबर रोजी भेंडे ले-आऊट व १० डिसेंबर रोजी वर्धमाननगर येथे ‘मैं लता - म्युझिकल कॉन्सर्ट’ हा कार्यक्रम होईल.