नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल केलेल्या अर्जावर कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱी विमला आर. यांनी सखोल पडताळणी केली व त्यानंतर आक्षेप फेटाळत बावनकुळे यांचा अर्ज वैध असल्याचा निर्वाळा दिला.
रवींद्र भोयर यांनी बुधवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शपथपत्रातील विविध बाबींवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. बावनकुळे हे कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानचे पदाधिकारी आहेत. या संस्थानाला शासनाकडून अडीचशे कोटींचा निधी प्राप्त झाला असून, हे देवस्थान ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’मध्ये येते. मूळ शपथपत्रात बावनकुळे यांनी याबाबत उल्लेख केला नव्हता. नवीन शपथपत्र स्वीकारण्यात येऊ नये अशी भूमिका भोयर यांनी घेतली आहे. सोबतच बावनकुळे यांच्या कुटुंबीयांची पदे तसेच संपत्तीच्या तपशिलावरदेखील त्यांनी आक्षेप घेतला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व आक्षेप फेटाळले व बावनकुळे यांचा अर्ज वैध ठरविला. केला. दरम्यान, बावनकुळे यांच्या शपथपत्राची सत्यप्रत देण्यात यावी, अशी मागणी भोयर यांनी परत अर्ज करीत केली.
कुठलीही लपवाछपवी केलेली नाही -बावनकुळे
या संदर्भात बावनकुळे यांना विचारणा केली असता मी देवस्थानाच्या पदावर असलो तरी एकही रुपया मानधन घेत नाही. मग ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’चा प्रश्न येतच नाही. शपथपत्रात मी वास्तविक तपशील मांडले असून कुठलीही लपवाछपवी केलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
सर्व उमेदवारांचे अर्ज वैध
या निवडणूकीसाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची बुधवारी छाननी झाली व सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. आता यातील किती उमेदवार अर्ज परत घेतील याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.