कुंडली तयार ; पहिला टप्पा पार : फाईल पोहचली वरिष्ठांकडे नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनी आणि मसल्स पॉवरच्या आधारे कोराडी, गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरात जंगलराज निर्माण करणारा कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(मोक्का)अन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यासंबंधाने पोलिसांनी दिलीप ग्वालबन्सीची जी फाईलवजा कुंडली तयार केली त्या फाईलने प्रस्ताव मंजुरीचा पहिला टप्पा पार केला असून, अंतिम मंजुरीसाठी ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या टेबलवर पोहचली आहे. पोलीस अधिकारी फितूर अशा प्रकारे गुंड आणि पोलिसांची सोबत घेणाऱ्या ग्वालबन्सीने काही राजकीय नेत्यांसोबतही घसट वाढवून काही नगरसेवकही स्वत:च्या अवतीभवती उभे केले होते. हे नगरसेवक, राजकीय नेते ग्वालबन्सीच्या ‘गुंडा राज’ची पाठराखण करीत होते. त्यामुळे ग्वालबन्सी टोळी कमालीची सैराट झाली होती. तब्बल २५ वर्षांपासून त्याने कोराडी, गिट्टीखदान, मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षरश: जंगलराज निर्माण केले होते. त्याची दहशत एवढी तीव्र होती की, एका पोलीस अधिकाऱ्याचे घर ग्वालबन्सीने बळकावल्यानंतर त्यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला. मात्र, कोर्टात हा पोलीस अधिकारीच फितूर झाला. अशाच प्रकरणातील एका पोलिसांचे घर बळकावल्याप्रकरणी २०१४ मध्ये ग्वालबन्सीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, तीन वर्षे होऊनही त्या पोलिसाला त्याच्या घराचा ताबा मिळाला नाही. बिहारमधील जंगलराज वाटावे,अशी दहशत निर्माण करून कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीने शेकडो जणांच्या कोट्यवधींच्या जमिनी हडपल्या. सर्वसामान्य माणूसच नव्हे तर त्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भूखंडही बळकावले आहेत. ग्वालबन्सीचे पोसलेले गुंड एका रात्रीत मनात येईल, त्या मोक्याच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर कब्जा करीत होते. जमिनीभोवती कुंपण घालून त्यावर मालकी हक्काचा फलक लावत होते. मूळ जमीन मालक ते पाहून ग्वालबन्सीकडे गेला तर त्याला कब्जा सोडण्याचे लाखो रुपये मागितले जात होते. रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यास त्याला मारहाण करून त्याच्या कुटुंबीयांसमोर अपमानित केले जायचे. त्याला अन् कुटुंबातील सदस्यांना अपहरण करण्याची, ठार मारण्याची धमकी देऊन दहशतीत आणले जात होते. ग्वालबन्सीने निर्ढावलेल्या गुंडांची टोळी पोसण्यासोबत काही भ्रष्ट पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आपल्या दावणीला बांधले होते. त्यामुळे ग्वालबन्सीची तक्रार घेऊन जाणाऱ्या पीडिताला पोलीस हाकलून लावत होते. त्याला समेट करण्याचा सल्लाही देत होते. जमिनीसाठी जीवाचा धोका कशाला पत्करतो, असे म्हणून पोलीस पीडित व्यक्तीवरील दहशत अधिक गडद करीत होते. अखेर पापाचा घडा फुटला मनात येईल त्याची जमीन बळकावणाऱ्या भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीच्या पापाचा घडा अखेर फुटला. मात्र, त्यासाठी भूपेश सोनटक्के या सिव्हील इंजिनिअरला आपला जीव द्यावा लागला. भूपेशची दोन ते अडीच कोटी रुपयांची जमीन विकत घेण्याच्या नावाखाली दिलीप, राजू माटे आणि त्याच्या साथीदारांनी भूपेशकडून सह्या घेऊन बनावट कागदपत्रे तयार करवून घेतली. त्यानंतर ही जमीन हडपून भूपेशची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक कोंडी केली. त्याला कंटाळून भूपेशने गळफास लावून घेतला. मात्र, आत्महत्येपूर्वी त्याने कुख्यात दिलीप आणि त्याच्या साथीदारांच्या पापाचे पुरावे एका चिठ्ठीच्या रूपाने मागे ठेवले. सध्या अकोल्यात पोलीस अधीक्षक असलेले तत्कालीन पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांच्याकडे हे प्रकरण जाताच त्यांनी बारकाईने तपास करवून घेत भूमाफिया दिलीप आणि साथीदारांच्या बेधडकपणे मुसक्या बांधल्या. त्याला कोठडीत टाकून त्याच्याकडून अनेक पापांची कबुली वदवून घेतली. पोलीस आयुक्त, सहआयुक्तांनी हिरवा सिग्नल देताच ग्वालबन्सी टोळीविरुद्ध पोलिसांनी धडाकेबाज कारवाईचा सपाटा लावला. अवघ्या दोन आठवड्यात ग्वालबन्सीविरुद्ध १०० तक्रारी आल्या. त्यापैकी १५ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर अनेकांना त्यांच्या जमिनीचा ताबा देण्यात आला. कोराडी मार्गावरील तवक्कल सोसायटीत झोपडपट्टीच्या नावाखाली बसविण्यात आलेली ३०० घरांची वसाहतही पोलिसांनी भुईसपाट केली. हे सर्व करतानाच दिलीप आणि त्याच्या टोळीची संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला. सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्याकडून या प्रस्तावाची फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त किंवा सहआयुक्तांकडून तिला मंजुरी मिळताच भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई केली जाणार आहे.
भूमाफिया ग्वालबन्सीवर मोक्का!
By admin | Published: June 07, 2017 1:44 AM