एमईपी आयडीएल : दोन टप्प्यात बांधकामनागपूर : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडने (एमईपी आयडीएल) पहिल्या टप्प्यात जामठा ते फेटरीपर्यंत चार पदरी रिंग रोडचे बांधकाम सुरू केले आहे. उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एमईपी आयडीएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील रस्त्याची लांबी ३३.५० कि़मी आणि दुसऱ्या टप्प्यात फेटरी ते धारगांवपर्यंतच्या चार पदरी आऊटर रिंग रोडची लांबी २८.०५ कि़मी. राहील. उत्तर ते दक्षिण आणि दक्षिण ते पूर्वेकडे जाणारा महामार्ग नागपूर शहरातून जातो. प्रस्तावित रिंग रोड शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल. यामुळे प्रस्तावित नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरसाठी उत्तम संपर्क सूत्रता प्रदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिट पेवमेंटच्या बांधकामाचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये नवीन रेल्वे ओव्हरब्रीज आणि वीणा नदीवर दोन नवीन पूल व तीन उड्डाण पुलाचा समावेश आहे. दुसऱ्या पॅकेजमध्ये ग्रीनफोल्ड अलॉयमेंटचा समावेश आहे. यामध्ये चार पदरी काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये चार नवीन रेल्वे ओव्हरब्रीज, तीन उड्डाण पूल आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. नवीन अलॉयमेंट फेटरी गावापासून सुरू होऊन कापसी गावापर्यंत समाप्त होणार आहे. आवश्यक सुविधांमध्ये सौंदर्यीकरणावर भर देण्यात येणार आहे. हा प्रकल्प नवीन हायब्रीड एन्युइटी मॉडेल अंतर्गत येत असून इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट, कन्सलटंट (ईपीसी) आणि बिल्ड आॅपरेट ट्रान्सफर (बीओटी) सिस्टीमचे मिश्रण आहे. दोन्ही टप्प्यात चार पदरी रिंगरोडच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंपनीमध्ये मार्चमध्ये १,१७० कोटी रुपयांचा करार झाला आहे. (प्रतिनिधी)
चार पदरी आऊटर रिंग रोडचे भूमिपूजन
By admin | Published: October 19, 2016 3:20 AM