मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : विकास कामाचे श्रेय लाटण्यात लाेकप्रतिनिधी तरबेज झाले आहेत. याच्या श्रेयवाद व प्रसिद्धीच्या हव्यासापाेटी माैदा तालुक्यातील धर्मापुरी-मोरगाव-महालगाव मार्गाचे दाेनदा भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाच्या कामाला संथगतीने का हाेईना सुरुवात झाली आहे.
धर्मापुरी-महालगाव हा या भागातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या आठ किमी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी जाेर धरू लागल्याने तीन वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जा व पालकमंत्र्यांनी या मार्गाच्या कामाचे पहिल्यांदा भूमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी दहेगाव-खात व धर्मापुरी-मोरगाव या ११ किमी मार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही नागरिकांना सांगितले हाेते. या कामाला सुरुवात तर करण्यात आली, मात्र चार दिवसात काम बंद करण्यात आले.
या मार्गाची दैनावस्था झाल्याने लाेकमतमध्ये ‘धर्मापुरी-मोरगाव रस्त्यावर मरण स्वस्त’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या राेडच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. ही सुरुवात करण्यापूर्वी स्थानिक लाेकप्रतिनिधीने गाजावाजा करीत पुन्हा याच कामाचे भूमिपूजन केले. परंतु, तीन वर्षांपासून या राेडचे काम का रखडले, याचे उत्तर द्यायला ते लाेकप्रतिनिधी तयार नाहीत.
...
मार्ग एक, कंत्राटदार दाेन
धर्मापुरी-महालगाव या एकाच ११ किमीच्या मार्गाच्या कामाचे कंत्राट दाेन कंत्राटदारांना देण्यात आले. धर्मापुरी-मोरगावपर्यंतचा मार्ग एका तर मोरगाव-महालगावपर्यंतचा मार्ग दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आला आहे. यात धर्मापुरी-मोरगाव राेडवरील खराब डांबरीकरण काढण्यात आले असून, खडीकरणाला सुरुवात झाली आहे. मोरगाव-महालगाव दरम्यानच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही.
...
सर्वकाही श्रेय लाटण्यासाठी
हा संपूर्ण प्रकार श्रेय लाटण्यासाठी केला जात असल्याचा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे. निधी मंजूर हाेऊनही या मार्गाचे वेळीच काम का करण्यात आले नाही. शिवाय, कमी अंतराच्या कामाचे कंत्राट दाेघांना का देण्यात आले, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळवून देण्यासाठी लाेकप्रतिनिधीने हा उपद्व्याप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.