लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.न्या. धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयातील पहिल्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायमूर्ती असून ते सध्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग २३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक पार पडली. त्यात झालेल्या निर्णयानुसार न्या. धर्माधिकारी यांची मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. ही शिफारस मंजूर झाल्यानंतर न्या. धर्माधिकारी २७ एप्रिलपर्यंत मुख्य न्यायमूर्ती राहतील. या दिवशी ते सेवानिवृत्त होणार आहेत.२८ एप्रिल १९५८ रोजीचा जन्म असलेले न्या. धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर, म्हणजे १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले होते. नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर-१९८० पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांनी १९८४ पर्यंत अॅड. एच. एस. घारे यांच्या हाताखाली वकिली केली. त्यानंतर ते स्वतंत्रपणे वकिली करायला लागले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी विविध न्यायालयांमध्ये विविध प्रकारची प्रकरणे हाताळली. ते हायकोर्ट बार असोसिएशनचे ग्रंथालय प्रभारी व कोषाध्यक्ष होते. तसेच, त्यांनी ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याते म्हणूनही सेवा दिली आहे.दोन्ही न्यायालयांत नागपूरकर प्रमुखसर्वोच्च न्यायालयामध्ये नागपूरकर न्या. शरद बोबडे प्रमुख न्यायमूर्ती आहेत तर, मुंबई उच्च न्यायालयात न्या. भूषण धर्माधिकारी हे मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. ही बाब नागपूरकरांना दुहेरी अभिमान प्रदान करणारी आहे.
भूषण धर्माधिकारी मुख्य न्यायमूर्ती : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 8:52 PM
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ठळक मुद्देकॉलेजियमची शिफारस