पारडी, बोरगाव. काचीपुरा, हुडकेश्वर येथे पोळा : बैलांना सजवून खाऊ घातली पुरणपोळींनागपूर : पोळा म्हणजे बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. हा सण शेतकरी मोठ्या भक्तीभावनेने साजरा करतात पण नागरिकही पोळ्याला बैलाची पूजा करुन त्याला नैवेद्य दाखवून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. शेतातील उत्पादन आणि धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्याला साथ मिळते ती बैलाची. कारण बैल त्याची शक्ती वापरून शेताची नांगरणी, वखरणी करतो. सध्याच्या तंत्रयुगात मशीन्स आल्या असल्या तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा खरा साथी बैलच आहे. त्यामुळेच पोळ्याला बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे पूजन केले जाते. एका अर्थाने ही श्रमाची पूजाच असते. शहरातही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. बैलाच्या श्रमामुळेच शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन घेता येणे शक्य होते. हे धान्य नंतर नागरिकांना मिळते. अन्न ही अत्यंत महत्त्वाची उर्जा निर्माण करण्यात मोलाचे योगदान देणारा बैल त्यामुळेच पुजनीय आहे. यानिमित्त आज शहरात अनेक ठिकाणी पोळा भरविण्यात आला. बळीराजाने यासाठी बैलांना विशेष सजविले होते. बैलांना कालच खास आवतनही देण्यात आले. पोळ्यानिमित्त बैलांना कामापासून आराम दिला जातो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून तुतारी लावली जात नाही. बैलाच्या खोंडाला तेलातुपाने, हळदीने शेकल्या जाते. यानंतर बळीराजाने बैलांना सजवून पोळ्याच्या ठिकाणी आणले. बैलाची पूजा करून त्यांना मारुतीच्या देवळात नेण्यात आले आणि पोळा फुटला. यानिमित्त शहरात अतिशय उत्साहाचे वातावरण होते. पोळा फुटल्यावर शेतकऱ्यांनी बैलांना घरोघरी नेले. याप्रसंगी गृहिणींनी बैलांना ओवाळून त्यांना नैवेद्य दिला आणि शेतकऱ्यांना बोजारा दिला. (प्रतिनिधी)
बळीराजाने व्यक्त केली बैलाप्रति कृतज्ञता
By admin | Published: September 13, 2015 2:38 AM