नागपूर : सरकारी कंपनी एअर इंडिया नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील बुकिंग कार्यालयासह देशातील दहा मोठ्या शहरांमध्ये स्वत:च्या मालकीची संपत्ती विकण्याची तयारी करीत आहे. नागपुरात एअर इंडियाच्या बुकिंग कार्यालय इमारतीसाठी ३७ कोटी रुपयांची रिझर्व्ह प्राईज ठेवण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त बोली लावणारे या संपत्तीचे मालक बनणार आहे.
जवळपास २७ हजार चौरस फूटाचा भूखंड १९८४ मध्ये एअर इंडियाला जिल्हा प्रशासनातर्फे मौजा अधिकारात आवंटित करण्यात आला होता. १९८७ मध्ये जमिनीचा करार झाला आणि १९९२ मध्ये ही इमारत तयार झाली. तेव्हापासून या इमारतीत बुकिंग कार्यालयाचे संचालन होऊ लागले. मार्च १९९३ मध्ये एअर इंडियाचे तत्कालीन विभागीय संचालक शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्या काळात येथे १०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते. तेव्हा एअर इंडियाला कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता. काही वर्षानंतर जेट, सहारा, किंगफिशर, इंडिगो, डेक्कन एअरवेज आदी काही विमान कंपन्यांनी आपली सेवा सुरू केली. सरकारी एअरलाईन्समध्ये देण्यात येणाऱ्या काही सवलतींमुळे एअर इंडियाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एअर इंडियाच्या कार्यालयात जवळपास २० कर्मचारी कार्यरत आहेत.
संपत्ती विकण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नोटिसानुसार ८ जुलैला बोलीला सुरुवात होणार असून ९ जुलैला बंद होईल. ई-लिलावांतर्गत बोली मागविण्यात आली आहे. एअरलाईन्सच्या नागपूर बुकिंग कार्यालय इमारतीशी अनेक कर्मचाऱ्यांच्या आठवणी आणि भावना जुळल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इमारत विकण्याचे दु:ख होत आहे.