लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीसोबतची चर्चा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांच्या बैठका झाल्या आहेत. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच यासंबंधात निर्णय होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचा दावा केला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. त्यासाठी महाआघाडी हा एक उत्तम पर्याय आहे. कुणाचे प्राबल्य कुठे आहे, हे पाहून जागा वाटप होईल. यातही काही अचडण जाणार नाही, असे सांगत या महाआघाडीत शिवसेना व मनसेला स्थान नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, पुण्यात आमच्याकडेही सक्षम उमेदवार आहेत. अद्याप जागांची चर्चा व्हायची आहे. कोणत्या जागा कुणाला द्यायच्या, हे ठरायचे आहे. जिंकण्याची क्षमता पाहून निर्णय घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, उमाकांत अग्निहोत्री, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.आम्हाला आपसात भिडवू नका आपले प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची चर्चा असल्याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, पक्षात कुणीही कायमस्वरूपी पदावर नसतो. माझे मोहन प्रकाश यांच्याशीही चांगले संबंध होते व मल्लिकार्जुन खारगे यांच्याशीदेखील आहेत. त्यामुळे आम्हाला आपसात भिडविण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. लवकरच नागपूरसह राज्याच्या सर्व विभागात खारगे यांचे दौरे आयोजित केले जाणार आहेत. ८ व ९ जुलै रोजी मुंबईत आयोजित बैठकीतही ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांचे काम ‘बिलो अॅव्हरेज’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकूणच काम ‘बिलो अॅव्हरेज’ राहिले आहे. घोषणा खूप केल्या, पण तशी कृती केली नाही. त्यांच्या कार्यकाळाचा उल्लेख ‘विश्वासघात के चार साल’ असेच करावे लागेल. फडणवीस हे विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करायचे, असा चिमटाही त्यांनी काढला. नागपुरात १०० दिवसात ६३ खून झाले. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना ही बाब गंभीरपणे घ्यायची नाही का, असा सवालही त्यांनी केला.माणिकरावांनी निवडणूक लढवावी विधान परिषदेवर काही सहकाऱ्यांना संधी मिळू शकली नाही. पण ते आगामी निवडणुका लढवू शकतात. माणिकराव ठाकरे यांनीही निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. कुठली लढवावी हे त्यांनी ठरवावे. वझाहत मिर्झा हे काँग्रेसचे यवतमाळचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसने दलित व मुस्लीम नेत्यांना संधी देऊन सोशल इंजिनिअरिंग साधले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात बरेच इच्छुक नागपुरातून लोकसभेसाठी विलास मुत्तेमवार यांच्यासह नाना पटोले, नितीन राऊत, भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांची संख्या पाहून नागपुरात अवघड आहे, असे वाटत नाही. राजकारणात अनेक चमत्कार पाहिले आहेत, असेही ते म्हणाले. गटबाजीवर लक्ष वेधले असता वैयक्तिक मतभेद सर्वच पक्षात असतात, पक्ष जिवंत असल्याचे ते लक्षण आहे. नागपूर शहराची कार्यकारिणी तयार करण्याचे अधिकार शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.