लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईहून अमिताभ बच्चन यांचे चार्टर्ड विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मोहननगरातील एका शाळेच्या परिसरात चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्यात आला आहे. ‘बिग बी’ येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ते नेमके किती दिवस नागपुरात असतील याबाबत नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.कोण आहेत विजय बारसे ?हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. शिवाय राज्यभरात ‘स्लम सॉकर’ला तरुणांनी डोक्यावर घेतले.
चित्रपटाच्या शुटिंगसाठी ‘बिग बी’ नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:50 PM
झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देचाहत्यांमध्ये उत्साह‘स्लम सॉकर’फेम विजय बारसेंवर चित्रपटाची कथा आधारित