लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:नागपूरकर तसे चित्रपट, नाटक व कलेचे दर्दी. पण चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या बाबतीत उपराजधानी तशी दुर्लक्षितच होती. पण २०१८ च्या सरतेशेवटी येथील चाहत्यांना एक मोठी भेट मिळाली. बॉलिवूडचा शहनशाह, महानायक अमिताभ बच्चन हेच नागपूरकरांच्या भेटीला आले. नुसते भेटीला आले नाहीत तर येथे तळ ठोकला. अर्थात चित्रीकरणाच्या निमित्तानेच. ‘झुंड’ नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट नागपूरचे फुटबॉल कोच विजय बारसेंच्या जीवनावर आधारित. त्यामुळे शुटींग नागपुरात होईल, हे ठरलेलेच. त्याचसाठी बिग-बी येथे आले, राहिले, शुटींगमध्ये घाम गाळला. आता महानायक म्हटल्यावर चाहते रोमांचित होणार नाही तर नवलच. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी आटापिटा केला, शुटींगच्या स्थळी तासन्तास उभे राहून त्यांची वाट पाहिली, त्यांना भेटण्यासाठी जीवाचे रान केले. अर्थात नागपूरकरांचे हे प्रेम अमिताभच्या नजरेतून कसे सुटेल. म्हणून तेही भावूक झाले. अगदी नवलाई ठरावे असे बैलगाडीवर प्रवासाचे, खेड्यातल्या खाटेवर झोपण्याचे शुटींगमधील मंतरलेले क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करताना संत्र्याचा गोडवा असलेल्या नागपूरकरांच्या प्रेमाबद्दलची भावनिकता त्यांनी व्यक्त केली. बैलगाडीवर पुढच्या प्रवासाला निघावे आणि ‘आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा...’ असा भारावलेला निरोप अमिताभ यांनी घेतला.
आम्ही जातो अमुच्या गावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:52 AM
‘झुंड’ नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट नागपूरचे फुटबॉल कोच विजय बारसेंच्या जीवनावर आधारित. त्यामुळे शुटींग नागपुरात होईल, हे ठरलेलेच. त्याचसाठी बिग-बी येथे आले, राहिले, शुटींगमध्ये घाम गाळला.
ठळक मुद्देबिग बी ने ट्विटरवर दिला नागपूरकरांना निरोप