लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डेरेदार शिंगावर मोरपिसांचा तुरा, गळ्यात घुंगरांच्या माळा, पाठीवर नक्षीदार झुल असा साजशृंगार करून सर्जा राजांच्या जोड्या पोळ्यात मोठ्या तोऱ्यात उभ्या होत्या. एक नमन गौरा पारबती हरबोला हर महादेव म्हणत पोळ्यात झडत्यांनी रंगत आणली होती. सजलेल्या सर्जाराजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. नैवेद्यरुपात त्याला पंचपक्वान खाऊ घालण्यात आले. ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. पारडीच्या पोळ्याला १५१ वर्षाची परंपरापारडीमध्ये भरणाऱ्या पोळ्याला १५१ वर्षाची परंपरा लाभली आहे. या पोळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. या पोळ्यात परिसरातील गावातून ५०० च्यावर नंदीबैलांच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या. या जोड्या बघण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक पारडीत जमले होते. यावेळी काही युवकांनी शारीरिक कवायतीही सादर केल्या. पारडी दुकानदारासंघाच्या वतीने बर्फाची भव्य शिवपिंड तयार केली होती. यानिमित्त मेळावासुद्धा भरला होता. आयोजकांनी प्रत्येक जोडीचे पूजन करून, आकर्षक दिसणाऱ्या जोडीला पुरस्कार देऊन गौरव केला. या आयोजनात माजी नगरसेवक देवेंद्र मेहर, महादेव मेहर, गजानन भजभुजे, शकील शेख, पुरुषोत्तम मंदीरकर, विनोद मानकर, विनय भुरे, पांडुरंग मेहर, विठ्ठल मेहर, श्रीकांत लारोकर, प्रवीण मल्लेवार, दिलीप बारसागडे, सौरभ वरखडे, रवी मेहर, चरणदास बावणे, विकास मेहर, शैलेश मेहर, कैलास खंडाळे, गजानन डोंगरे, वालिदास चवारे, देवेंद्र लांजेवार, दिनेश देशमुख, अखिल चवारे, भय्यालाल बिसेन, वामनराव मेश्राम, राजेश गिरीपुंजे, बंडू बोंद्रे, मनोज आतिलकर, सुधीर मानवटकर आदींचे सहकार्य लाभले.काछीपुऱ्यातही रंगला बैल पोळा काछीपुरा किसान समितीच्या वतीने काछीपुरा चौकात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. समितीच्या वतीने काछीपुरा चौक रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका रूपा राय उपस्थित होत्या. काछीपुऱ्यातील शेतकरी जियालाल शाक्य, कमलेश शाक्य, गिरीश सक्सेना, दिलीप शाक्य, अशोक शाक्य, मनोज वर्मा, चांगोजी पटले यांनी काछीपुरा वस्तीतून बैलांना सजवून वाजत गाजत चौकात आणले. त्यानंतर सर्व शेतकरी बांधव बैलांना घेऊन दर्शनासाठी महादेव मंदिरात नेले. दर्शन करून आल्यानंतर मान्यवरांनी बैलांची पूजा करून शेतकऱ्यांना रुमाल आणि रोख पारितोषिक दिले. सजविलेल्या एकूण सात बैलजोड्या पोळ्यासाठी आणण्यात आल्या होत्या. पोळा पाहण्यासाठी बच्चे कंपनी, नागरिक आणि महिलांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पोळ्याचे क्षण टिपले. काछीपुरा किसान समितीच्या पोळ्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ब्रिटिशांनी काछीपुरा भागात भाजीचे पीक घेण्यासाठी काची समाजाच्या नागरिकांना आणले होते. त्यांना शेतीसाठी जागा दिली. तेव्हापासून काछीपुरा भागात शेती होत असून दरवर्षी पोळा उत्साहात साजरा करण्यात येतो. काछीपुरा भागात अजूनही शेतकरी आपल्या शेतीत भाजीपाल्याचे पीक घेतात. दरवर्षी उत्साहात हे शेतकरी काछीपुरा चौकात पोळा साजरा करतात. कार्यक्रमाला काछीपुरा किसान समितीचे अध्यक्ष श्रीकांत शाक्य, सदस्य आशीष वर्मा, विकास सक्सेना, कुबेर वर्मा, शुभम शाक्य, संतोष बिसेन, संजय चौरागडे, सतीश सक्सेना, ओम वर्मा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपुरात उत्साहात साजरा झाला मोठा बैल पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:56 PM
ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला.
ठळक मुद्देपारडी, काछीपुरा, बोरगावमध्ये भरला पारंपरिक पोळा : झडत्या आणि मिरवणुकीने भरला उत्साह